भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो ७वा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचे सध्या ९३४ गुण असून दुसऱ्या स्थानी असलेल्या स्टीव स्मिथचे ९२९ गुण आहेत.
जून २०११मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. त्यानंतर प्रथमच एखादा भारतीय खेळाडू या स्थानावर विराजमान झाला आहे.
एजबस्टन कसोटी सामन्यानंतर आज आयसीसी क्रमवारी घोषीत करण्यात आली. कोहलीने या सामन्यात पहिल्या डावात १४९ तर दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या. यामुळे तब्बल ३२ महिने अव्वल स्थानी असलेल्या स्टीव स्मिथला पाठीमागे सारत कारकिर्दीत ६७ कसोटी सामने खेळलेला विराट प्रथमच अव्वल स्थानी विराजमान झाला.
डिसेंबर २०१५मध्ये स्टिव स्मिथ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला होता. त्यानंतर प्रथमच त्याची आयसीसी क्रमावारीत घसरण झाली आहे.
राहिलेल्या ४ सामन्यात जर विराटने चांगली कामगिरी केली तर तो या स्थानी कायम रहाणार आहे.
यापुर्वी कसोटी क्रमावारीत सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसकर यांनी अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
जानेवारी २०११मध्ये सचिन प्रथमच अव्वल स्थानी आला होता. त्यानंतर जून २०११मध्ये सचिनला हे स्थान गमवावे लागले होते.
आयसीसी क्रमवारीत ९३४ हे भारतीय खेळाडूंमधील सर्वाधिक गुण विराट कोहलीने मिळवले आहे. तर सार्वकालीन कसोटी क्रमवारीत विराट आता १४व्या स्थानी आला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप १०: टीम इंडिया पराभूत, परंतु या १० विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
–विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले