येत्या १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. भारतीय संघाने देखील १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करत टी२० विश्वचषकासाठी तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी अशी चर्चा रंगली आहे की, टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याऐवजी रोहित शर्मा याला मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद दिले जाणार आहे. या चर्चेला पूर्णविराम देत स्वतः कोहली आपल्या पदाचा राजीनामा देत रोहीतकडे नेतृत्वपद सोपवणार असल्याची माहिती आता पुढे येत आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआय देखील वेगवेगळ्या स्वरूपासाठी वेगवेगळ्या कर्णधाराची नियुक्ती करू शकते. असे झाले तर, रोहितला वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद देण्यात येईल, तर कोहली केवळ कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसून येईल.
टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर नवीन कर्णधार?
भारतीय वनडे, टी-२० आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सध्या कोहलीकडे आहे. त्याने क्रिकेटच्या तिनही स्वरूपात भारतीय क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. परंतु तो आता वनडे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितला देणार असल्याचे समजत आहे. टाइम्स ऑफ इंडियाला एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रोहितचा मार्ग मोकळा होऊन तो भारताच्या वनडे आणि टी-२० संघाचा नवीन कर्णधार नियुक्त केला जाऊ शकतो.
नेतृत्वामुळे विराट कोहलीच्या फलंदाजीवर येतोय दबाव
कोहलीने गेल्या काही दिवसात संघ व्यवस्थापक आणि रोहितसोबत या विषयावर चर्चा केली आहे. तिनही स्वरूपात संघाचे नेतृत्व केल्यामुळे कोहलीच्या फलंदाजीवर दबाव येतोय. त्याची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहिली तर तुम्हाला याचा अंदाज येईलच. त्यामुळे कोहलीला देखील असे वाटत आहे की, त्याने फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे.
भारतीय संघाला २०२२ आणि २०२३ मध्ये दोन विश्वचषक (वनडे आणि टी-२०) स्पर्धा खेळायच्या आहेत. कोहली भारतीय संघातील महत्वाचा फलंदाज आहे. त्यामुळे त्याने चांगली कामगिरी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीची विजय मिळवण्याची सरासरी अनुक्रमे ७०.३० आणि ६७.४४ टक्के आहे.
कोहलीची कर्णधारपदावरून माघार भारतीय संघासाठी का ठरेल फायदेशीर?
एका सूत्राने म्हटले की, “कोहलीला असे जाणवले आहे की, तिनही स्वरूपात संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे त्याचा परिणाम आता त्याच्या फलंदाजीवरही दिसू लागला आहे. त्याला थोडा वेळ हवा आहे. तो अजूनही संघासाठी भरपूर काही करू शकतो. जर त्याने वनडे आणि टी-२० क्रिकेटची जबाबदारी रोहितला देऊन स्वतः कसोटी संघाचे नेतृत्व केले, तर हे कोहलीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.तो वनडे आणि टी-२० क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करून खेळू शकतो. कोहली अवघ्या ३२ वर्षांचा आहे. त्याची फिटनेस पाहता तो कमीत कमी ५-६ वर्ष तरी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळू शकेल. यादरम्यान तो आणखी मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो.” (Virat Kohli is likely to step down as odi and t20 captain)
रोहितला संघाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य वेळ
रोहित सध्या वनडे आणि टी -२० संघात उपकर्णधाराची भूमिका पार पाडत आहे. तसेच त्याने कोहलीच्या अनुपस्थित संघाचे नेतृत्व करत भारतीय संघाला विजय देखील मिळवून दिले आहेत. याखेरीज मुंबई इंडियन्स संघाला त्याने ५ वेळेस जेतेपद पटकावून दिले आहे. त्यामुळे रोहितला संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
मिस्टर अन् मिसेस कोहलीला दुबईतील हॉटेलकडून ‘चॉकलेटी सरप्राईज’, खास वेलकमने अनुष्का खुश
‘या’ ३५ वर्षीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
आयपीएलप्रेमींनो, धरा युएईची वाट!! २ वर्षांनंतर स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश, पण आहे एक अट