मित्रांनो, २ एप्रिल, २०११ ही तारिख कदाचित आपल्यापैकी कोणताही क्रिकेटप्रेमी विसरणार नाही, नाही का? हा दिवस क्रिकेट इतिहासात भारतासाठी तिसरा सर्वात महत्त्वाचा असणारा दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याच दिवशी २८ वर्षांनंतर भारतीय संघ आणि चाहते एखाद्या चातकाप्रमाणे दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याची वाट पाहत होते. हा सामना इतर कोणता सामना नसून २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामना होता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय संघाने या स्पर्धेतील बऱ्याच धुरंदर संघाना पराभवाचं तोंड दाखवत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती.
ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअम
या दिवशी भारतीय संघ मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषक आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी उतरला होता. भारतीय संघाला पराभूत करत विश्वचषकावर आपली मोहोर लावण्यासाठी उतरणारा संघ होता श्रीलंका. सामन्याची वेळ निश्चित झाली होती ती दुपारी २ वाजता.
धोनीने लगावला विजयी षटकार
श्रीलंका संघाचा कर्णधार कुमार संगाकाराने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १५० धावाही पूर्ण न करता श्रीलंकेने आपल्या पहिल्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. तिसरी विकेट होती ती कर्णधार कुमार संगाकाराची. त्याला आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २ धावा कमी असताना युवराज सिंग आणि कर्णधार धोनीने पव्हेलियनचा रस्ता दाखविला होता. भारतीय चाहत्यांमध्ये चांगलाच आनंद होता. पुढे श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज माहेला जयवर्धनेने नाबाद १०३ धावांची शतकी खेळी करत एका बाजूने किल्ला लढविला आणि संघाला समाधानकारक २७४ धावांपर्यंत पोहोचविले. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाच्या झहीर खान, युवराज सिंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स, तर हरभजन सिंगने १ विकेट घेतली होती.
भारतीय संघाने पदरात पडलेल्या आव्हानाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली. भारतीय संघाला पहिलाच झटका बसला तो विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागच्या (०-१) रुपात. त्यानंतर दुसरा झटका बसला तो ३१ धावांवर. ही विकेट होती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची. आता आघाडीचे फलंदाज ड्रेसिंग रूममध्ये होते. सचिन- सेहवाग चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले होते. काहींनी तर आपली टीव्हीदेखील बंद केल्या होत्या. अनेकांनी आपण हा विश्वचषकच गमावला असेच समजले होते. विराट कोहलीही ३५ धावा करत पव्हेलियनमध्ये परतला होता. परंतु ते म्हणतात ना ‘पिक्चर अभी बाकी है,’ तसं घडणं बाकी होतं. फलंदाजीसाठी येणारा पुढील फलंदाज गौतम गंभीरने विरोधी संघाच्या गोलंदाजांना पुरता घाम फोडत संघासाठी सर्वोच्च ९७ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाचा डाव आता २२३ वर ४ बाद असा होता. त्यानंतर धोनीच्या जोडीला आला होता अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. आजही त्याला विश्वचषकातील महत्त्वाचा खेळाडू समजले जाते.
धोनी आणि युवीची जोडी समोर येणाऱ्या प्रत्येक चेंडूला भेदत संघाचा डाव विजयाच्या दिशेने घेऊन जात होती. शेवटच्या २ षटकांमध्ये केवळ ५ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी युवीकडे स्ट्राईक होती. त्याने नुवान कुलसेकराच्या चेंडूवर १ धाव घेत स्ट्राईक धोनीला दिली. शेवटी नेहमीप्रमाणे ‘कॅप्टन कूल’ धोनीने विजयी षटकार लगावत सामनाच नव्हे, तर विश्वचषकावरही भारतीय संघाची मोहोर लावली. या सामन्यात धोनीला ‘सामनावीर’ म्हणून, तर युवीला ‘मालिकावीर’ म्हणून गौरविण्यात आले.
असे होते विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील भारतीय संघाचे स्कॉड
फलंदाज- विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, विराट कोहली
गोलंदाज- हरभजन सिंग, झहीर खान, प्रवीण कुमार, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, एस श्रीसंत
अष्टपैलू- आर अश्विन, पीयुष चावला, युवराज सिंग, युसूफ पठाण
यष्टीरक्षक- एमएस धोनी
यांमधून निवडलेला अंतिम ११ खेळाडूंचा संघ
सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, एमएस धोनी (यष्टीरक्षक आणि कर्णधार), सुरेश रैना, हरभजन सिंग, झहीर खान, मुनाफ पटेल आणि एस श्रीसंत.
या विश्वचषकातील केवळ १ खेळाडू आहे सध्या भारतीय संघाचा भाग
२०११ सालच्या विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंपैकी केवळ १ खेळाडू सध्याच्या भारतीय संघाचा भाग आहे. तो खेळाडू म्हणजेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. यांमध्ये धोनी व सुरेश रैनाचेही नावही जोडले गेले असते. परंतु त्यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त या विश्वचषकात खेळलेला वेगवान गोलंदाज एस श्रीसंतवर मॅच फिक्सिंगमुळे लागलेली ७ वर्षांची बंदी आता उठली आहे. नुकतेच त्याने आपण भारताकडून विश्वचषक खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. तर हरभजन सिंगने अद्याप निवृत्ती जाहीर केली नाही. तो बऱ्याच वेळा समालोचन कक्षात दिसतो. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो व आजही तो फेअरवेलच्या एका सामन्याच्या प्रतिक्षेत आहे.
२०११ विश्वचषकात फायनल खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरीक्त बाकी ५ खेळाडूंमध्ये काही खेळाडूंनी अद्याप आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केलेली नाही. या खेळाडूंमध्ये युसूफ पठाण, पीयुष चावला आणि आर आश्विन यांचा समावेश आहे. आर. आश्विन हा भारतीय कसोटी संघात खेळताना दिसतो व त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे तर पीयुष चावलाला भारतीय संघात संधी मिळत नाही. युसूफ पठाणचे वय बरेच झाले असून त्यालाही संधी मिळत नाही.
२०११ विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंपैकी विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, झहीर खान, प्रवीण कुमार, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, युवराज सिंग व एमएस धोनी अशा १० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून यातील रैना व धोनी आयपीएल खेळताना दिसणार आहेत.
तर निवृत्ती न घेतलेल्या खेळाडूंमध्ये सर्वच जण आयपीएलमध्ये दिसणार आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेटमधील ५ विचित्र नियम, जे क्वचितच कुणाला माहित असतील
-मुंबई इंडियन्सच्या ‘या’ ३ खेळाडूंना नाही मिळणार आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळायची संधी
-पवार साहेबांचे सासरे, ज्यांनी क्रिकेटमध्ये धावांना दाखवला सरासरीचा घाट
महत्त्वाच्या बातम्या-
-आज सीपीएलचा पहिला सामना होतं असलेल्या ब्रायन लारा स्टेडियमवर कोण पडणार भारी?
-फक्त आणि फक्त माझ्यामुळे वर्ल्डकप २०११ जिंकून देणाऱ्या धोनीचे वाचले कर्णधारपद
-इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार, दिल्ली कॅपिटल्सचे टेन्शन वाढले