आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ नंतर विराट कोहली क्रिकेटच्या टी२० प्रकारातून भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. नुकतीच या बाबतची घोषणा विराटने केली आहे. ही जबाबदारी आता दुसऱ्या कोणावर सोपवली जाणार आहे. या बातमीने विराट कोहलीच्या चाहत्यांचा मोठा हिरमुड झाला आहे. ‘स्प्लिट कॅप्टन्सी’च्या सूत्रावर जरी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी कोहलीच्या राजीनाम्यामुळे भारतीय संघाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
१. संघात उत्साहाचा अभाव येऊ शकतो
विराट कोहलीच्या आक्रमकतेचा सामना करणे या क्षणी कोणत्याही खेळाडूला किंवा कर्णधाराला सोपे जाणार नाही. भारतीय संघाला कोहलीच्या तापट शैलीचा अनेकदा फायदा झाला आहे आणि भारतीय खेळाडू विरोधी संघाच्या प्रत्येक आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देत आहेत. विराटच्या नेतृत्त्वापदाशिवाय संघाची आक्रमक भावना कमी होण्याची शक्यता आहे.
२. विराटच्या फलंदाजीवर होऊ शकतो परिणाम
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याची स्वतःची फलंदाजी चांगली झाली आहे. कर्णधार म्हणून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०.९५च्या सरासरीने ४१ शतके केली आहेत, तर एक खेळाडू म्हणून त्याने ४९.६४ च्या सरासरीने २९ शतके केली आहेत. कर्णधारपदाचा त्याच्यावरील भार कमी होईल आणि तो अधिक चांगली फलंदाजी करू शकेल, असा युक्तिवाद विराटला कर्णधारपदावरून काढून टाकताना करण्यात आला आहे. परंतु आकडेवारी याच्या उलट आहे. त्यामुळे कर्णधारपद जाण्याने त्याच्या फलंदाजीवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा चाहत्यांची राहील.
३. ऑस्ट्रेलियामध्ये चॅम्पियन कसे व्हावे?
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. सर्वप्रथम नवीन कर्णधाराला या स्पर्धेच्या पुढील आवृत्तीसाठी खूप कमी वेळ मिळणार आहे, ज्यामुळे भारतीय संघाला नुकसान होऊ शकते. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मालिका जिंकण्याचा अनुभव आहे. पण आता त्याच्या अनुपस्थितीत नवीन कर्णधाराला असा चमत्कार करणे कठीण होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत
असे ३ गोलंदाज, जे आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात घेऊ शकतात सर्वाधिक विकेट्स; २ भारतीयांचा समावेश