मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटमधील विश्वविक्रम हे एक खास नाते. १९८९ वर्ष, जेव्हापासून सचिनने क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे तेव्हापासून क्रिकेटमधील विक्रम हे सतत सचिन सोबत जोडले जाते. परंतु गेल्या काही वर्षात क्रिकेटमधील विक्रम हे नाव भारतीय कर्णधारासोबतही जोडले जाऊ लागले आहे.
विशेषकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा नवनवीन विक्रम रोज रचत आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने ७० चेंडूत ८२ धावांची चांगली खेळी आहे. याबरोबर विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
धावांचा पाठलाग करताना दिवस रात्र खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विराटने ४२६८ धावा केल्या आहेत. हा क्रिकेटमधील विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने धावांचा पाठलाग करताना दिवस रात्र खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात ४२४० धावा केल्या होत्या.
विराटने हा विक्रम २८ धावांनी मोडला असून या यादीत तो अव्वल स्थानी आहे. भारताचा लंकेविरुद्धचा पुढचा सामना २४ ऑगस्ट रोजी पल्लेकेल येथे होणार आहे.