इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव केला आहे. यामुळे इंग्लंडने या विजयासह मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली.
गेल्या काही काळापासून कोहली खराब फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मात्र, यात तो वारंवार अपयशी ठरत आहे. असे असले तरी, तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत कोहलीने भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत आपला समावेश करून घेतला आहे.
कोहलीने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या डावात ५५ धावांची खेळी केली. ज्यामुळे कोहलीने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्यांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पछाडले आहे. कोहलीची हे इंग्लंड विरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही १३ वी वेळ होती. यासह तो इंग्लंड विरुद्ध सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आला आहे.
कसोटीत इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक ५० पेक्षा धावा करण्याचा विक्रम भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. ज्यांनी इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी २० वेळा असा कारनामा केला आहे. त्यानंतर गुंडप्पा विश्वनाथ यांनी १६ वेळा, तर राहुल द्रविडने १५ वेळा हा कारनामा केला आहे. तसेच एमएस धोनीने इंग्लंडविरुद्ध १२ वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, हेडिंग्लेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला इंग्लंडने केवळ ७८ धावांत गुंडाळले होते. ज्यानंतर इंग्लंडने ४३२ धावा करत भारतीय संघावर ३५४ धावांची आघाडी मिळवली होती.
दुसऱ्या डावातील तिसऱ्या दिवशीही भारतीय फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांनी पुनरागमन करत भारतीय फलंदाजांवर चांगले वर्चस्व गाजवले. ज्यामुळे दुसऱ्या डावातही भारतीय संघ केवळ २७८ धावांवर सर्व बाद झाला.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ऑली रोबिन्सनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर क्रेग ओव्हर्टनने ३ विकेट घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि मोईन अलीला प्रत्येकी १ विकेट्स मिळाल्या. तर भारताकडून विराट कोहलीसह रोहित शर्मा (५९) आणि चेतेश्वर पुजारा (९१) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र, अन्य कोणालाही खास काही करता आले नाही.
महत्वाच्या बातम्या –
–दारूण पराभवानंतर विराट ‘या’ नकोश्या यादीत दुसऱ्या स्थानी
–रहाणेची विकेट अँडरसनसाठी ठरली ‘विक्रमी’! मुरलीधरननंतर ‘हा’ पराक्रम करणारा जगातील दुसराच गोलंदाज
–नको असलेल्या विक्रमाच्या यादीत पुजाराने द्रविडलाही सोडले मागे; ‘असा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय