भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक टी२० सामना काल पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्वपूर्ण खेळ करत इंग्लंडला ३६ धावांनी मात दिली. तसेच या विजयासह मालिका देखील ३-२ अशा फरकाने आपल्या खिशात घातली.
या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नक्कीच खुश असेल. मात्र त्याच्या आनंदावर विरजण घालणारी एक बातमी आता समोर येत आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरसह घातलेला वाद कोहलीला महागात पडण्याची शक्यता आहे.
काय होता वाद?
त्याचे झाले असे की, भारताने दिलेल्या २२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर फलंदाजी करत होता. या खेळी दरम्यान त्याने अर्धशतक झळकवले होते आणि तो संघाला विजयाकडे घेऊन जात होता. मात्र तेराव्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या एका चेंडूवर बटलरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फटका थेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या हार्दिक पंड्याच्या हातात गेला.
त्यामुळे ३४ चेंडूत ५२ धावा करणार्या बटलरची खेळी संपुष्टात आली. इंग्लंडला विजयी रेषेपार नेण्यात अपयश आल्याने वैतागलेला जोस बटलर तंबूत परतत असतांना काहीतरी पुटपुटला. मात्र हे पाहून भारताचा कर्णधार विराट कोहलीचा पारा चढला आणि तो वाद घालण्यासाठी बटलरच्या दिशेने धावला. त्या दोघांमधे या दरम्यान काहीशी शाब्दिक चकमक देखील उडाली. या चकमकीनंतर विराट कोहली अंपायर्स आणि जॉनी बेअरिस्टोसह बातचीत करत असल्याचेही दृश्य दिसून आले.
आयसीसी करू शकते कारवाई
मात्र या घटनेमुळे आता आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते. गेले काही दिवस कोहलीचे मैदानावरील वागणूक चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पंचांशी हुज्जत घातल्याने कोहली अडचणीत आला होता. त्यावेळी एका कसोटी सामन्याची बंदी घातली जाण्याची शक्यता होती, मात्र या कारवाईपासून तो वाचला होता. मात्र आता कालच्या जोस बटलरसह झालेल्या वादानंतर कोहलीवर दोन सामन्यांची बंदी येण्याची शक्यता आहे.
कारण, कोहलीच्या नावे सध्या दोन डीमेरिट पॉईंट्स जमा आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार जर २४ महिन्यांच्या कालावधीत एका खेळाडूच्या नावे ४ किंवा अधिक डीमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास त्या खेळाडूवर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे जर आता कालच्या प्रकारानंतर कोहलीच्या नावावर दोन डीमेरिट पॉईंट्स वाढल्यास भारतीय कर्णधाराला बंदीला सामोरे जावे लागेल.
महत्वाच्या बातम्या:
हार्दिकचे लागोपाठ २ गगनचुंबी षटकार, पत्नी नताशाने अशी दिली रिऍक्शन; पाहा व्हिडिओ
Video: निर्णायक सामना जिंकताच विराटचे सर्वप्रथम रोहितला आलिंगन, शुभेच्छा देत थोपटली पाठ