टीम इंडियाने वनडे मालिकेपाठोपाठ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकाही ०-२ने गमावली. या दौऱ्यातील सर्वात खराब फाॅर्ममध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली हाच होता.
आज दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर विराटने टीम इंडिया सतत क्रिकेट खेळणार असल्याचे सुतोवाच केले. परंतु जर विश्रांती घ्यायची असेल तर वैयक्तिक खेळाडूंना घ्यावी लागणार आहे असे सांगितले.
याच पार्श्वभूमीवर १२ ते १८ मार्च दरम्यान होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विराटला विश्रांती दिली जावु शकते.
१२ मार्च रोजी धरमशाला, १५ मार्च रोजी लखनऊ तर १८ मार्च रोजी कोलकाता असे तीन वनडे सामने भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे.
याच मालिकेदरम्यान १८ व २१ मार्च रोजी आशिया ११ विरुद्ध विश्व ११ सामना असे दोन टी२० सामने होणार आहेत. यातील दोन्ही सामने विराट खेळण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे दक्षिण आफ्रिकेबरोबर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाला नवा कर्णधार शोधण्याची गरज पडणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत संघाची कर्णधार पदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा हा देखील सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याला सावरण्यास वेळ लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अजून तरी घोषणा झालेली नाही. यामुळे वनडेत पुढच्या मालिकेत कोण कर्णधार असेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.