भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील ९ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी जुलै २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही.
धोनी क्रिकेटपासून दूर असला तरी तो वारंवार चर्चेत येत असतो. मागील वर्षी तो ६ महिने न खेळूनही सर्वाधिक कमाई करणाऱ्या जागतिक क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७चा टी२० विश्वचषक, २०११ चा वनडे विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. चेन्नई सुपर किंग्सबरोबर (Chennai Super Kings) त्याने १६.७८ कोटी रुपयांचा करार केला आहे. तसेच तो २०पेक्षा अधिक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये दिसतो.
मागील वर्षी धोनीने १६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर विराटबद्दल सांगायचं झालं तर त्याने जवळपास १८३ कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच विराटला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) या संघाकडून १९.८४ कोटी रुपये मिळाले होते. तसेच विराटही जवळपास १९ ब्रँड्सचा ब्रँड ऍंबेसेडर आहे. जाहिरातींमधून त्याने १५८ कोटी रुपयांची कमाई केली होती.
विराट आणि धोनी या दोन्ही खेळाडूंना २०१८-१९ साठी बीसीसीआयने (BCCI) वार्षिक मानधन करारात ठेवले होते. त्यावेळी विराटला ७ कोटी रुपये आणि धोनीला ५ कोटी रुपये देण्यात आले होते. तरी २०१९-२० साठी बीसीसीआयने धोनीचा वार्षिक मानधन करारात समावेश केला नव्हता.
विराट आणि धोनीच्या मागील वर्षीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, विराटने तिन्ही क्रिकेट प्रकारात एकूण ४४ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने ६४.६० च्या सरासरीने २४५५ धावा केल्या होत्या. तर धोनीने मागील वर्षी २३ सामन्यांमध्ये ५६.१५ च्या सरासरीने केवळ ७३० धावा केल्या होत्या.
एकूण कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, विराटने भारताकडून आतापर्यंत ८६ कसोटी सामने, २४८ वनडे सामने आणि ८२ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ७२४० धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ११८६७ धावा केल्या आहेत. तर टी२०त त्याने २७९४ धावा केल्या आहेत.
याशिवाय धोनीने भारताकडून आतापर्यंत ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत एकूण ४८७६ धावा केल्या आहेत. वनडेत १०७७३ धावा केल्या आहेत. तर टी२०त त्याने १६१७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियाचे ५ शिलेदार व त्यांच्या आवडत्या बाॅलीवूड अभिनेत्री
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात गेला थेट नग्न अवस्थेत