भारतीय संघाला डिसेंबर महिन्याअंती दक्षिण आफ्रिकेचा दौरा (India Tour Of South Africa) करायचा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातीलच एक बदल म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा वनडे संघाच्या नेतृत्त्वापदावरून पायउतार करणे. विराटने यापूर्वी स्व:तहून टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. परंतु तो वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदी कायम राहणार होता. मात्र बीसीसीआयने अचानक विराटला वनडे संघाच्या नेतृत्त्वापदावरून काढून टाकत रोहित शर्मा याच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली असल्याची घोषणा केली.
यानंतर अनेकांच्या बीसीसीआयच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यातच आता विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनीही याप्रकरणी आपले मत मांडले आहे. ते खेलनिती नामक एका पोडकास्टशी बोलत होते.
राजकुमार यांनी म्हटले की, “मी अजून तरी या प्रकरणी विराटशी बोललेलो नाही. त्याचा फोन स्विच ऑफ दाखवत आहे. त्याने आपला फोन स्विच ऑफ करण्यामागचे कारण मला माहित नाही. पण मला वाटते की, विराटने स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडले होते. त्यामुळे संघ निवडकर्त्यांनी त्यावेळी त्याला सांगायला हवे होते की, तू पूर्ण मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघांच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा दे. किंवा कोणत्याही स्वरुपातील कर्णधारपदावरुन त्याला काढायला नव्हते पाहिजे होते.”
“विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन का हटवण्यात आले, यामागचे कोणतेही कारण निवड समितीने सांगितलेले नाही. मला माहिती नाही की, बीसीसीआय आणि निवडकर्ते काय करू इच्छित आहेत. बीसीसीआयमध्ये अजिबात कसलीही पारदर्शकता नाही. हा सर्व प्रकार कशामुळे घडला हे मला अजूनही समजत नाहीये,” असेही ते म्हणाले.
राजकुमार यांनी पुढे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या वक्तव्यावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलीने विराटकडून वनडे संघाचे नेतृत्त्वपद काढून घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, त्याने विनंतीनंतरही टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा.
गांगुलींच्या या वक्तव्याविषयी बोलताना राजकुमार म्हणाले की, “मी नुकतेच गांगुलीचे वक्तव्य वाचले आहे. त्यानुसार, त्यांनी टी२० विश्वचषकापूर्वीच विराटला टी२० संघाचे नेतृत्त्वपद न सोडण्याचा सल्ला दिला होता. त्यांचे अशाप्रकाचे बोलणे ऐकून मी चकित झालो होतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
एक फ्लॉप कामगिरी अन् कारकिर्दीला फुलस्टॉप, दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकतो शेवटचा
विराटच्या लग्जरी कारने वेधले सर्वांचे लक्ष, कारची किंमत आणि खासियत ऐकून म्हणालं, ‘क्या कार है!’