पुढीलवर्षी 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये पुरुषांच्या टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की हा विश्वचषक आमचे मोठे लक्ष्य आहे.
आयसीसीने दिलेल्या वृत्तानुसार विराट या टी20 विश्वचषकाबद्दल म्हणाला, ‘हा टी20 विश्वचषक आमचे मोठे लक्ष्य आहे आणि या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत स्पर्धा करण्यासाठी पुढील 12 महिन्यांचा आम्ही चांगली तयारी करण्यासाठी उपयोग करणे हे देखील महत्त्वाचे आहे.’
‘जेव्हाही आमच्या खेळाडूंना टी20 सामन्यांसाठी निवडले जाते तेव्हा ते या विश्वचषकाच्या दृष्टीने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आलेल्या संधीचा उपयोग करण्यास उत्सुक असतात. आम्हाला अजून या विश्वचषकासाठी संघबांधणी करायची आहे.’
तसेच टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करण्याची संधी असलेला विराट म्हणाला, ‘भारताने 2007 ला झालेला पहिला टी20 विश्वचषक जिंकला आहे. त्यावेळी हा प्रकार नवीन होता आणि त्याच्या भविष्याबद्दल फार काही माहिती नव्हती. तेव्हापासून टी20 क्रिकेट खूप पुढे आले आहे.’
‘जर टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणारा दुसरा भारतीय कर्णधार होण्याची संधी मिळाली तर तो एक सन्मान असेल. खरंतर आशा आहे तिसरा मी कर्णधार ठरेल कारण आशा आहे की आमच्याआधी भारतीय महिला टी20 विश्वचषक जिंकतील.’
ऑस्ट्रेलियामध्ये पुरुषांचा विश्वचषक होण्याआधी पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये महिलांचा टी20 विश्वचषक होणार आहे.
त्याचबरोबर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल विराट म्हणाला, ‘आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियात खेळतो तेव्हा आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळतो. स्टेडीयममध्ये अनेक भारतीय चाहते असतात. पुढीलवर्षी जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये येऊ तेव्हा आणखी चाहते असतील अशी आशा आहे.’
पुरुषांच्या या टी20 विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे 10 संघ मुख्य विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत.
तसेच अन्य 6 संघ टी20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतून प्रवेश करतील. ही पात्रताफेरी आजपासून(18 ऑक्टोबर) संयुक्त अरब अमिराती येथे सुरु झाली आहे.






