नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी(5 मार्च) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 8 धावांनी रोमांचकारी विजय मिळवला. तसेच 5 सामन्यांच्या या वनडे मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात एका क्षणी ऑस्ट्रेलियाला 5 षटकात 29 धावांची गरज होती आणि मार्कस स्टॉयनीस शानदार फलंदाजी करत होता. त्यामुळे विजयाचे पारडे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकले होते. त्यावेळी भारताचे मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचे प्रत्येकी दोन षटके बाकी होते. तर एक षटक टाकण्यासाठी केदार जाधव आणि विजय शंकर असे पर्याय होते.
त्यामुळे कोहली शंकरला 46 व्या षटकात गोलंदाजी देण्याचा विचार करत होता. परंतू उपकर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने विराटला असे न करण्याचा सल्ला दिला आणि विराटनेही हा सल्ला स्विकारत त्याचा निर्णय बदलला.
विराटने 46 वे षटक बुमराहला दिले तर शंकरला शेवटच्या षटकात गोलंदाजी दिली. शंकरनेही हा विश्वास सार्थ ठरवत स्टॉयनिस आणि ऍडम झम्पाला बाद करत घेत भारताला विजय मिळवून दिला. तर बुमराह आणि शमीनेही चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठ्या धावा घेण्यापासून रोखले.
त्यामुळे विराटने धोनी आणि रोहितच्या सल्ल्याने घेतलेला हा निर्णय अखेर भारतासाठी महत्त्वाचा ठरला. याबद्दल विराटने सामन्यानंतर खूलासा केला.
विराट म्हणाला, ‘मी 46 व्या षटकात शंकरला किंवा केदारला गोलंदाजी देण्याचा विचार करत होतो. मी याबद्दल रोहित आणि धोनीशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की जर बुमराह आणि शमीने विकेट्स घेतल्या तर आपले आव्हान सामन्यात टिकून राहिल आणि सामन्यात तेच झाले.’
त्याचबरोबर विराट शंकरचे कौतुक करताना पुढे म्हणाला, ‘त्याने चेंडू योग्य जागेत टाकले. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्हीमध्ये चांगला खेळ केला.’
तसेच धोनी आणि रोहितबद्दल विराट म्हणाला, ‘दोघेही अनुभवी आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करणे नेहमीच चांगले असते. रोहित उपकर्णधार आहे आणि धोनी बऱ्याच काळापासून येथे आहे. हे खेळाडू खेळ चांगला जाणतात. मी गोलंदाजांशीही चर्चा केली.’
महत्त्वाच्या बातम्या –
–‘रनमशिन’ विराट कोहलीला या दिग्गजाने दिले नवीन टोपणनाव
–धोनीचा हा अफलातून झेल टीम इंडियाच्या आला कामी…
–जेव्हा एमएस धोनी भरमैदानात चाहत्याला देतो त्रास…, पहा व्हिडिओ




