भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना 14 जानेवारीला राजकोट येथे खेळला जाणार आहे. यामध्ये यजमान संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. यामुळे दुसऱ्या सामन्यावर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. वडोदरामध्ये झालेल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी श्रेयस अय्यरही काही मागे राहिला नाही. मागील 20 वनडे डावांमध्ये कोणी सर्वाधिक धावा केल्या हे पाहिले असता अय्यरच वरचढ असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राजकोटचा सामना प्रभावी फलंदाज कोण हे ठरवेल.
मागील काही सामने पाहिले असता विराट बरोबर रोहित शर्मा यानेही अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. या दोघांनी तर चौकार- षटकार फटकारत शतके-अर्धशतके झळकावलीत. मात्र अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने काही काळ संघाबाहेर राहिला होता. असे असले तरी त्याने अनेक सामन्यांमध्ये मोठ्या खेळी करत रनमशीन विराटला मागील 20 डावांमध्ये सर्वाधिक धावा करत मागे टाकले.
अय्यरने त्याच्या 20 डावांमध्ये 1030 तर विराटने 1024 धावा केल्या आहेत. यावरून दोघांमध्ये केवळ 6 धावांचे अंतर आहे. तसेच रोहितने 927 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडे विश्वचषक जवळ आला असून या तिघांवर संघाची मोठी जबाबदारी असेल. तसेच मागील दोन्ही आयसीसी वनडे स्पर्धांमध्ये विराट-रोहित बरोबर अय्यरनेही फलंदाजी करताना योग्य भुमिका पार पाडली आहे. या स्पर्धांमध्ये विराटने 918, रोहितने 777 आणि अय्यरने 773 धावा केल्या.
त्याचबरोबर अय्यरकडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. यासाठी त्याने जर दुसऱ्या वनडेत केवळ 34 धावा केल्या तर तो 69 डावांमध्ये सर्वात जलद 3000 वनडे धावा करणारा भारतीय खेळाडू ठरेल. त्याच्याआधी शिखर धवन याने 72 डाव आणि विराटने 75 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.






