ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान गुरुवारपासून (१७ डिसेंबर) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ झाला. ऍडलेड येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी भारताचे प्रमुख ६ फलंदाज २३३ धावांवर बाद करत, भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीचा भार सांभाळणाऱ्या नॅथन लायनने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, आपली प्रतिक्रिया दिली आहे. कसोटीचा पहिला दिवस आमच्यासाठी संतोषजनक राहिला, असे लायनने म्हटले.
ऑस्ट्रेलियाने केली दमदार गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर उत्कृष्ट फलंदाजी करत भारताच्या सलामीवीरांना झटपट तंबूत धाडले. चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. पुजारा बाद झाल्यानंतरही, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व कर्णधार विराट कोहलीने ८८ धावांची भागीदारी करून, भारतीय धावसंख्येला आकार दिला. विराट बाद झाल्यानंतर, भारताची काहीशी पडझड झाली. दिवसाखेर भारताची धावसंख्या ६ बाद २३३ अशी राहिली.
लायनने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट
पहिल्या दिवशी किफायतशीर गोलंदाजी करणार्या ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लायनने सामन्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. लायन म्हणाला, “भारतीय कर्णधार विराट कोहली धावबाद होणे हा सामन्याचा टर्निंग पॉइंट होता. तो अशा पद्धतीने बाद होणे, आमच्यासाठी फायदेशीर ठरले. तो उत्कृष्टरीत्या फलंदाजी करत होता. पहिल्या दिवसाचा खेळ आमच्या बाजूने राहिला. उद्या आम्ही सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करू.”
विराट आणि पुजारा जागतिक दर्जाचे फलंदाज
लायनने विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्या भागीदारीचे कौतुक केले. पुजाराला बाद करणारा लायन म्हणाला, “विराट आणि पुजाराला गोलंदाजी करताना मजा आली. ते दोघे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. पहिल्या दोन दिवशी या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांसाठी तितकी मदत नसते. त्यात, दोघांची फिरकी गोलंदाजांना खेळण्याची शैली भिन्न आहे. मला कायमच चांगल्या फलंदाजांविरुद्ध खेळायला आवडते. पुजाराला बाद करून आनंद झाला.”
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचे सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर, चेतेश्वर पुजाराने १६० चेंडूंचा सामना करताना ४३ धावांची संयमी खेळी केली. अखेरीस, लायनने मार्नस लॅब्यूशानेच्या हाती त्याला झेल द्यायला भाग पाडले. लायनने पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल दहाव्यांदा बाद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोणत्याही परिस्थितीत मला तिथे उपस्थित रहायचे आहे’, पालकत्व रजेवर बोलताना विराटचे वक्तव्य
दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला विराट; केली ‘ही’ अचाट कामगिरी
ऑस्ट्रेलियात मैदान गाजवणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या घालवतोय पत्नीसोबत वेळ; फोटो व्हायरल