भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यासाठी गेल्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघ इनडोर स्टेडियममध्ये चांगलाच घाम गाळतात दिसून येतोय. मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाईल. ऍडलेड येथील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजेमुळे मायदेशी परतेल. त्यामुळे विराटच्या अनुपस्थित भारतीय संघ कमजोर पडेल, असे भाकीत अनेक माजी खेळाडूंनी केले आहे. मात्र, आकडेवारीचा विचार केला, तर या दिग्गजांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे दिसून येतेय.
कोहलीच ठरतो ऑस्ट्रेलियातील ‘किंग’
विराटच्या ऑस्ट्रेलियातील आकडेवारीचा विचार केला, तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर, ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा फक्त विराटने केल्या आहेत. विराटने ऑस्ट्रेलियात १२ कसोटी सामने खेळताना, २३ डावात ५५.३९ च्या लाजवाब सरासरीने १,२७४ धावा जमवल्या आहेत. ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या सचिन तेंडुलकरने २० कसोटीत १,८०९ धावा आपल्या नावात केल्या होत्या. यात त्याची सरासरी ५३.२० अशी राहिली.
कर्णधार म्हणून विराटच्या नावे आहेत सर्वाधिक धावा
कर्णधार म्हणून विराट ऑस्ट्रेलियात भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. विराटने ऑस्ट्रेलियात आत्तापर्यंत कर्णधार या नात्याने ७३१ धावा कुटल्या आहेत. त्याने या यादीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि एमएस धोनी या दिग्गजांना पछाडले आहे. धोनी ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून खेळलेल्या ५ कसोटीत अवघ्या १७० धावांचे योगदान देऊ शकला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारताचा माजी कर्णधार व फिरकीपटू अनिल कुंबळे हा ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून फक्त चार सामने खेळून १७९ धावा बनवण्यात यशस्वी ठरला आहे.
कसोटीच्या दोन्ही डावात शतके ठोकणारा एकमेव भारतीय कर्णधार
विराटने ऑस्ट्रेलियात आत्तापर्यंत सहा कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या सहा सामन्यांच्या ११ डावात त्याने ७३१ धावा आपल्या खात्यात जोडून घेतल्या. विराटच्या नावे कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात चार शतके देखील आहेत. ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून खेळताना विराटने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती. २०१४ च्या दौऱ्यावर विराटने ऍडलेड कसोटीत भारताचे नेतृत्व करताना ११५ व १४१ धावांच्या खेळ्या केल्या होत्या.
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकांत ऑस्ट्रेलियाचा राहिला वरचष्मा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान आतापर्यंत ९८ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यातील २८ सामन्यात भारताने विजय मिळवला तर ४२ सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. उर्वरित सामन्यांपैकी एक सामना बरोबरीत सुटला, तर २७ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४८ कसोटी सामने खेळला आहे. त्यातील फक्त ७ सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. तर, २९ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आत्तापर्यंत २६ कसोटी मालिका खेळवल्या गेल्या आहेत. त्यातील ९ मालिका भारताने जिंकले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाने १२ मालिकांवर कब्जा केलेला दिसून येतो. भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन आतापर्यंत १२ मालिका खेळल्या आहेत. त्यातील फक्त एक मालिका जिंकण्यात भारताला यश आले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०१८-२०१९ मध्ये ही कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण