मुंबई । भारतीय कर्णधार विराट कोहलीची गणना आज जगातील सर्वात आक्रमक फलंदाजांमध्ये केली जाते. पण त्याच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा तो खराब फॉर्मबरोबर झगडत होता. 2014 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड दौरा हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट दौरा मानला जात होता.
आजही तो दौरा त्याच्यासाठी एका वाईट स्वप्नासारखा आहे. त्या दौर्यावर कोहली 10 डावांमध्ये खराब फ्लॉप झाला. तसेच त्यांला बऱ्याच टीकेचा सामनाही करावा लागला. या दौर्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यात चार शतकांसह दमदार पुनरागमन केले.
इंग्लंडहून परत येताच त्याने सचिन तेंडुलकरशी संवाद साधला आणि त्याच्या मदतीने त्याने त्या चुकांवर मात केली. ‘बीसीसीआयच्या वाहिनी’ वर मयांक अग्रवाल यांच्याशी बोलताना भारतीय कर्णधारानं इंग्लंड दौर्यानंतर आपल्या फलंदाजी तंत्रात बदल घडवून आणला असल्याचे सांगितले.
‘ओपन नेट्स विथ मयंक’ शोमध्ये कोहली मयंकशी बोलताना म्हणाला की, “बरेच लोक त्यांच्या करिअरमधील चांगल्या काळाला मैलाचा दगड म्हणतात. पण 2014 चा तो दौरा माझ्यासाठी मैलाचा दगड आहे.”
इंग्लंडच्या खराब दौर्यावरुन परतल्यानंतर विराट सचिन तेंडुलकरशी बोलला आणि मुंबईत त्याच्याबरोबर काही सत्रे मैदानावर घालवली. सचिनने वेगवान गोलंदाजांविरूद्ध त्याला ‘फॉरवर्ड प्रेस’ चे महत्त्व पटवून दिले.
“मी माझ्या पोझिशनमध्ये बदल केल्यानंतर साऱ्या काही गोष्टीत बदल घडू लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दौरा झाला. इंग्लंडमध्ये काय चुकले होते ते मला उमगले,” असे कोहलीने सांगितले.
कोहली म्हणाला की, “इंग्लंड दौर्यादरम्यान ‘हिप पोजीशन’ हा मुद्दा आहे. परिस्थितीनुसार, ते समेट करण्यास आणि मला जे करायचे होते ते करण्यास असमर्थ होतो. हा काळ वेदनादायक होता. हिप स्थानामुळे फटके मारण्यावर मर्यादा येत होत्या.”