“भारतीय संघ व्यवस्थापनानं आयपीएल 2024 मधील विराट कोहलीच्या उत्कृष्ट फॉर्मचा विचार करून त्याला पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत सलामीला पाठवावं”, असं मत माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यानं व्यक्त केलं आहे. आयपीएलच्या या हंगामात कोहलीनं 12 सामन्यांमध्ये 70.44 ची सरासरी आणि 153.51 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटनं 634 धावा ठोकल्या आहेत. तो सध्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीचा करिअर स्ट्राइक रेट 134.31 एवढा आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “विराट सध्या खूप चांगला खेळत आहे. काल रात्री (पंजाबविरुद्ध) कोहलीनं झटपट 90 धावा केल्या. या फॉर्मचा विचार करता तुम्ही त्याचा टी20 विश्वचषकात सलामीचा फलंदाज म्हणून वापर केला पाहिजे. त्याच्या गेल्या काही आयपीएल डावांवर नजर टाकली तर ते अप्रतिम आहेत. त्यामुळे त्यानं विश्वचषकात डावाची सुरुवात करावी.”
सौरव गांगुली पुढे बोलताना म्हणाला, “भारतानं टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी ट्रॉफी जिंकण्याची क्षमता असलेला संतुलित संघ निवडला आहे. हा संघ खूप चांगला आहे. संघात फलंदाजीतील सखोलतेशिवाय गोलंदाजीही उत्कृष्ट दिसते.” गांगुली पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. आपल्याकडे कुलदीप, अक्षर आणि सिराज यांचा अनुभव आहे. यावेळी संघ संयोजन आदर्श आहे.”
आयपीएलच्या या हंगामात संघ 250 धावांचा टप्प सहज गाठत आहेत. यावर भाष्य करताना सौरव गांगुली म्हणाला की, “भविष्यातही हाच ट्रेंड कायम राहील. टी20 आता ताकदीचा खेळ झाला आहे. आता आम्ही आयपीएलमध्ये नियमितपणे 240, 250 धावा पाहत आहोत. याचं मुख्य कारण म्हणजे फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी आणि भारतातील मैदानंही तेवढी मोठी नाहीत.” येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, गेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्यात 40 षटकांत एकूण 26 षटकार ठोकले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार बदलाच्या चर्चांवर लखनऊच्या मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण, केएल राहुलकडेच असणार संघाचं नेतृत्व