सध्या जारी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 88 धावा निघाल्या आहेत. त्यापैकी बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं 70 धावा केल्या होत्या.
विराट कोहलीनं शेवटचं कसोटी शतक 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मारलं होतं. गेल्या चार वर्षांत त्याला कसोटी क्रिकेटमध्ये केवळ दोन वेळा 100 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. कोहलीची ही निराशाजनक कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनं त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिलाय. कार्तिक म्हणतो की कोहली हा असा खेळाडू आहे, ज्याला आव्हान आवडतं. सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहे. या प्रश्नांची उत्तरंही विराटला लवकरच सापडेल, असा विश्वास कार्तिकला आहे.
‘क्रिकबझ’शी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “विराट कोहलीसाठी हे सोपे नव्हतं. ही मालिका त्याच्यासाठी चांगली राहिली नाही. त्यानं चारपैकी तीन डावात निराश केलं. येथे त्याला फिरकीपटूंनी त्रास दिला. मला वाटतं की तो या प्रश्नांची उत्तर शोधत असेल. जेव्हा तुम्ही टॅलेंट आणि सुपर स्टारडमच्या या पातळीवर पोहचता, तेव्हा तुमच्यासमोर असे आव्हानं उभे राहतात. भारताला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळायला आवडतं, मात्र त्यांचा गेमप्लॅन काय आहे?”
कार्तिक पुढे म्हणाला, “तो किती सक्षम आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण ही मालिका त्याच्यासाठी सोपी नव्हती. आम्ही हे झाकण्याचा प्रयत्न करत नाही. गेल्या 2-3 वर्षांपासून फिरकीविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.” शेवटी विराट कोहलीला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देताना कार्तिक म्हणाला, “त्याला कदाचित देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतावं लागेल आणि डीआरएसच्या सध्याच्या नियमांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. यात काही शंका नाही की डावखुरे फिरकीपटू मोठा धोका बनतात.”
हेही वाचा –
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गंभीर कोच नसणार, या माजी खेळाडूला मिळाली टीम इंडियाची जबाबदारी
कोच गॅरी कर्स्टनचं पाकिस्तान संघाशी बिनसलं, लवकरच सोडणार साथ
जर टीम इंडिया बाहेर पडली तर कोणते दोन संघ WTC फायनल खेळतील? हे आहेत दावेदार