शनिवारी (०६ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने ३-१ च्या फरकाने कसोटी मालिकेत विजयी पताका झळकावली. रिषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, रोहित शर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी संघाच्या विजयाच मोलाचा वाटा उचलला. परंतु भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र फलंदाजीत संघर्ष करताना दिसला.
यानंतर चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या फलंदाजीवर टीका करायला सुरुवात केली आहे. अशात भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने विराटला रोहितकडून चांगल्या फलंदाजीचे धडे घेण्याचा सल्ला दिला आहे.
म्हणून विराटने रोहितकडून फलंदाजीबाबत सल्ला घ्यावा
प्रसिद्ध क्रिकेट वेबसाइट क्रिकबजशी बोलताना तिवारी म्हणाला की, “भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेली कसोटी मालिका अतिशय कठीण खेळपट्टीवर खेळली गेली आणि या गोष्टीचा सर्वांनी स्विकार करायला पाहिजे. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर खेळपट्टीवर चेंडू सातत्याने वळण घेताना दिसत होता. याच कारणामुळे दोन्हीही संघ मोठी आकडी धावसंख्या उभारू शकले नाहीत.”
“विराटविषयी बोलायचे झाले तर, तो फलंदाजी करताना अधिकतर चेंडू सोडत होता. अशा खेळपट्टीवर सुनिल गावसकरांप्रमाणे फलंदाजी करायला पाहिजे. सुरुवातीला खेळपट्टीवर काही वेळ घालवायचा आणि प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याऐवजी काही चेंडू सोडायचे. रोहित शर्माचे अगदी अशाचप्रकारे फलंदाजी केली,” असे तिवारी पुढे म्हणाला.
तसेच शेवटी बोलताना त्याने सांगितले की, “जेव्हा तुम्ही चेंडू सोडता तेव्हा हळूहळू तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ लागतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, विराट ऑफ स्टंपवर फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसतो. जेव्हा एखाद्या फलंदाजाची जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजामध्ये गणना केली जाते, तेव्हा त्याला वाटू लागते तो प्रत्येक चेंडू खेळतो. पण वास्तवात असे नसते. म्हणून त्याने फलंदाजीबाबत रोहितकडून सल्ले घ्यायला हवेत.”
विराट-रोहतिची कसोटी मालिकेतील कामगिरी
इंग्लंडविरुद्ध झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने अवघ्या १७२ धावा केल्या. दरम्यान केवळ पहिल्या कसोटीत त्याला ७२ धावांची खेळी करता आली. तर दोन वेळा तो भोपळाही न फोडता माघारी परतला. याउलट रोहितने १६१ धावांची झुंजार दीडशतकी खेळी करत पूर्ण मालिकेत ३४५ धावा चोपल्या. यासह तो कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही रिषभला वजन कमी करायला लावलं, यष्टीरक्षणावर काम केलं आणि…,” गुरुजींचा खुलासा
वाढदिवस विशेष: जेव्हा विवियन रिचर्ड्स यांनी कराचीतील मैदानावर आणले होते तुफान