इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमनेसामने आले. यामध्ये आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार शतकवीर विराट कोहली हा ठरला. विराटने शानदार शतक पूर्ण करत आपल्या संघाला स्पर्धेत कायम ठेवले. या विजयानंतर त्याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
आरसीबीला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य हैदराबादकडून मिळाले होते. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीमुळे आरसीबीने हे लक्ष्य डावातील चार चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले. विराने 62 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर आपले शतक पूर्ण केले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी बोलताना विराट म्हणाला,
“हैदराबादने मोठी धावसंख्या उभी केली होती. त्यामुळे आम्हाला चांगली सलामी देणे गरजेचे होते. मात्र, इतकी चांगली सलामी मिळेल असे वाटले नाही.”
आपल्या कामगिरीबद्दल बोलताना तो म्हणाला,
“मागील आकडेवारी कशी आहे याकडे मी फारसे लक्ष देत नाही. थोडासा फॉर्मचा विषय होता. मात्र, मी नेहमीच पुढचा विचार केला आहे. संघातील सर्व खेळाडू उत्साहीत आहेत. आज हैदराबादमध्ये प्रेक्षकांची चांगली साथ मिळाली. आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळत असल्याचा भास होत होता.”
या विजयानंतर आता आरसीबीची प्ले ऑफ्समध्ये जाण्याची संधी वाढली आहे. आरसीबीचा अखेरचा सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना जिंकल्यानंतर ते 16 गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. मुंबईने आपला अखेरचा सामना जिंकला तरी सरस धावतीच्या जोरावर आरसीबी प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरू शकते.
(Virat Kohli Statement After Century Against Sunrisers Hyderabad In IPL 2023)