भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने शनिवारी (१५ जानेवारी) सर्वांना धक्का देणारा निर्णय जाहीर केला. त्याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर मोठी पोस्ट करत त्याने त्याचा हा निर्णय सर्वांसमोर जाहीर केला. त्यामुळे विराट आता टी२० आणि वनडे पाठोपाठ कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोस्टमध्ये काय म्हणाला विराट?
विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याबद्दल भावनिक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘संघाला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’
‘या प्रवासादरम्यान अनेक चढ-उतार आले, पण प्रयत्नांचा किंवा विश्वासाचा अभाव कधीच नव्हता. मी जे काही काम करतो त्यासाठी १२० टक्के समर्पण देण्यावर मी विश्वास ठेवतो आणि जर मी ते करू शकत नसेल, तर मला माहित आहे की, असं करणे योग्य नाही. माझ्या मनात गोष्टी पूर्ण स्पष्ट असतात आणि मी कधीही संघाबरोबर अप्रामाणिक वागू शकत नाही.’
पुढे विराटने म्हटेल आहे की, ‘मला बीसीसीआयचे आभार मानायचे आहेत की, दिर्घकाळासाठी त्यांनी मला राष्ट्रीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सर्व संघसहकाऱ्यांचे आभार, ज्यांनी मी संघासाठी बाळगलेल्या ध्येयासाठी योगदान दिले आणि ज्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. तुम्ही सर्वांनी हा प्रवास अविस्मरणीय आणि सुंदर केला.’
याबरोबरच भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असलेल्या विराटने पुढे लिहिले आहे की, ‘रवी भाई (रवी शास्त्री) आणि सपोर्ट स्टाफ यांचेही आभार, ते कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती करणाऱ्या या गाडीचे इंजिन होते. तुम्ही सर्वांनी ध्येय प्रत्यक्षात गाठण्यासाठी सर्वात मोठा वाटा उचलला.’
विराटने एमएस धोनीहीचे आभार मानले. त्याने म्हटले की, ‘शेवटी, विशेष आभार एमएस धोनीचे, ज्याने माझ्यावर कर्णधारपदासाठी आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेणारी सक्षम व्यक्ती म्हणून माझ्यावर विश्वास टाकला.”
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
विराटची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने आत्तापर्यंत ६८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले होते. त्याने यातील ४० सामन्यात विजय मिळवला असून १७ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच ११ सामने त्याच्या नेतृत्त्वाखाली अनिर्णित राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आदर्शवत’ अशीच राहिली विराटची नेतृत्व कारकीर्द; कोणालाही न जमलेले केलेत अनेक पराक्रम
विराटचा कसोटी संघनायक पदाचा राजीनामा; पण ‘हे’ आकडे पाहून म्हणाल, ‘भाऊ थोडी घाई केलीस’
बिग ब्रेकिंग! विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरूनही पायउतार, सोशल मीडियावर केली घोषणा