भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने शनिवारी (१५ जानेवारी) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून गेले ७ वर्षे तो कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळत होता. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर त्याचा हा निर्णय सर्वांसमोर आला आहे.
एमएस धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीने जानेवारी २०१५ मध्ये भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. अखेर विराटने ७ वर्षांनंतर या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
विराटने कर्णधारपद सोडल्याची पोस्ट करताना म्हटले आहे की, ‘संघाचा योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी गेली ७ वर्षे कठोर परिश्रम, चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’
याशिवाय विराटने बीसीसीआय, संघसहकाऱ्यांसह, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचे आभार मानले आहेत. तसेच कर्णधारपदासाठी त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल एमएस धोनीचेही त्याने आभार मानले आहेत.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022
काहीदिवसांपूर्वीच मर्यादीत षटकांच्या कर्णधारपदावरूनही पायउतार
विराटने गेल्याचवर्षी सप्टेंबरमध्ये तो भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद टी२० विश्वचषकानंतर सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्याने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर निवड समीतीने त्याच्याकडून वनडे संघाचे कर्णधारपदही काढून घेतले होते आणि भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली होती. आता विराटने कसोटी कर्णधारपदही सोडले असल्याने ही जबाबदारी बीसीसीआय कोणाच्या खांद्यावर टाकणार हे पाहावे लागणार आहे.
विराटची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने आत्तापर्यंत ६८ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले होते. त्याने यातील ४० सामन्यात विजय मिळवला असून १७ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच ११ सामने त्याच्या नेतृत्त्वाखाली अनिर्णित राहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
फिरकीपटू नॅथन लायनने भल्याभल्या फलंदाजांना सोडले मागे, दिवस-रात्र कसोटीत षटकारांचा केला भीमपराक्रम
ब्रॉड बनला ‘अव्वल नंबरी’! ऍशेस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले स्वतःचे नाव
वनडे मालिकेसाठी सरावाला लागला भारतीय संघ, कसोटी मालिकेचा वचपा काढण्यावर असेल ‘राहुलसेने’ची नजर