पाऊस आणि अंधुक प्रकाशाच्या व्यत्ययानंतर अखेर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना शेवटच्या टप्प्यावर आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे चालू असलेल्या या सामन्याच्या पाचव्या दिवसाखेर (२२ जून) भारताने ३२ धावांची आघाडी घेतली आहे. कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली नाबाद खेळत आहेत. दरम्यान ‘रनमशीन’ विराटने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १२ चेंडूत नाबाद ८ धावा केल्या आहेत. तत्पुर्वी पहिल्या डावात त्याने ४४ धावांची खेळी केली होती. यासह तो क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातील आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा चोपणारा पहिला फलंदाज ठरला आहे. याबाबत त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, रिकी पाँटिंग अशा बऱ्याचशा दिग्गजांना मागे टाकले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी कसोटी अजिंक्यपद, ५० व ६० षटकांचा विश्वचषक आणि टी२० विश्वचषक, या आयसीसीच्या क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातील स्पर्धांमधील उपांत्य फेरी अन् अंतिम सामन्यात मिळून विराटने एकूण १२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ६७.२५ च्या उल्लेखनीय सरासरीने सर्वाधिक ५३८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या आयसीसीच्या स्पर्धांतील ५ अंतिम सामन्यांतील २१२ धावांचाही समावेश आहे.
आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराटनंतर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १६ सामने खेळताना ५ अर्धशतकांच्या मदतीने ५३१ धावा केल्या आहेत. यातील ३२० धावा या त्याने आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग (५०९ धावा), माजी भारतीय फलंदाज सौरव गांगुली (४८९ धावा) आणि माजी श्रीलंकन क्रिकेटपटू माहेला जयवर्धने (४८४ धावा) यांचा टॉप-५ मध्ये समावेश आहे.
याखेरीज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या विक्रमाच्या यादीत तब्बल नवव्या क्रमांकावर आहे. त्याने ११ सामन्यात ३९४ धावा करत या क्रमांकावर ताबा मिळवला आहे.
आयसीसी स्पर्धांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा
५३८ धावा- विराट कोहली (१२ सामने)
५३१ धावा- कुमार संगकारा (१६ सामने)
५०९ धावा- रिकी पाँटिंग (१४ सामने)
४८९ धावा- सौरव गांगुली (८ सामने)
४८४ धावा- माहेला जयवर्धने (१६ सामने)
४०० धावा- जॅक कॅलिस (८ सामने)
३९८ धावा- रोहित शर्मा (११ सामने)
३९८ धावा- ऍडम गिलक्रिस्ट (१२ सामने)
३९४ धावा- सचिन तेंडुलकर (११ सामने)
आयसीसीच्या स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा
३२० धावा- कुमार संगकारा (७ सामने)
२७० धावा- माहेला जयवर्धने (७ सामने)
२६२ धावा- ऍडम गिलख्रिस्ट (४ सामने)
२४७ धावा- रिकी पाँटिंग (६ सामने)
२१२ धावा- विराट कोहली (५ सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! एका इंस्टाग्राम पोस्टमधून भारतीय क्रिकेटपटू कमावतात बक्कळ पैसा; रोहित घेतो ४२ लाख, तर विराट…
‘इंग्लंडमध्ये जन्मलो असतो, तर आज जिवंत नसतो’; वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गजाचे हैराण करणारे वक्तव्य
लॉकडाऊनमध्ये पत्नीने कापले होते पुजाराचे केस; खुलासा करत म्हणाला, ‘पूजाने माझे केस फक्त एकदा…’