भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यासाठी (Virat Kohli) हा कसोटी सामना खूप खास आहे. कारण विराट कोहलीचा त्याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना आहे. विशेष म्हणजे या सामन्यात विराट केवळ खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. त्याने जानेवारी महिन्यात कसोटी कर्णधापदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
पण, चाहत्यांना विराट कोहलीचा १०० वा सामना स्टेडियममध्ये पाहता येणार नाही. कारण बीसीसीआयने या सामन्यासाठी प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिलेली नाही.
आता दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या १००व्या कसोटी सामन्याबाबत वक्तव्य केले आहे. विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्याबद्दल सुनील गावसकर म्हणाले की, ‘सध्या त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू कोणी नाही. मी एवढेच म्हणेन की ही एक मोठे यश आहे. लहान असताना तुम्हाला देशासाठी खेळायचे असते. एके दिवशी देशासाठी खेळत असताना तुम्हाला कळते की तुम्ही शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. ही एक अद्भुत भावना आहे. केवळ कसोटीच नाही, तर तिन्ही प्रकारामध्ये विराटने जबरदस्त कामगिरी केली आहे.’
गावसकर पुढे म्हणाले की, ‘विराट कोहलीने १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावून तो संस्मरणीय बनवावा, अशी माझी इच्छा आहे. जर त्याने असे केले तर तो अशा थोड्याच खेळाडूंच्या यादीत सामील होईल, ज्यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.’ आतापर्यंत केवळ ९ फलंदाजांनी आपल्या १००व्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे.
विराट कोहलीने मोहालीच्या मैदानात पाऊल ठेवताच त्याच्या नावावर विक्रम होईल. भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारा तो १२वा खेळाडू ठरणार आहे. विराटच्या १००व्या कसोटी सामन्यात अनेकांना त्याच्या शतकाही अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ ४ मार्च ते ८ मार्च श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना मोहालीत, तर १२ मार्च ते १६ मार्च दुसरा कसोटी सामना बंगळुरूमध्ये खेळणार आहे. दुसरा सामना प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत राखून भारताचा करून दिला फायदा, पाहा कसं?
पुजारा-राहणेला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही मिळणार नाही स्थान? वाचा सविस्तर
मुंबईच्या ‘या’ खेळाडूला करायचीय तब्बल ७२ तास फलंदाज, वर्ल्डरेकॉर्ड करण्याचा आहे मानस