भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला ‘रनमशीन’ असे म्हटले जाते. अगदी त्याच्या टोपननावाप्रमाणेच कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धावा केल्या आहेत. त्यातही कामाच्या ताणामुळे हा दिग्गज क्रिकेटपटू टी२० विश्वचषक २०२१ नंतर टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडणार आहे. त्यामुळे या विश्वस्तरीत स्पर्धेमध्ये आपल्या प्रदर्शनाची पुन्हा एकदा छाप सोडण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल. अशात टी२० विश्वचषकात एक मोठा विक्रम त्याच्या निशाण्यावर असेल. टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपण्याचा हा विक्रम आहे.
२००७ पासून सुरु झालेल्या टी२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१२ ते २०१६ या कालावधीत टी२० विश्वचषकात १६ सामने खेळताना ९ अर्धशतकांच्या मदतीने ७७७ धावा केल्या आहेक. त्याच्यापुढे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान, वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू माहेला जयवर्धने हे आहेत.
जयवर्धने हा सर्वाधिक धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. २००७ ते २०१४ दरम्यान एकूण ३१ सामने खेळताना त्याने ४० च्या सरासरीने १०१६ धावा केल्या आहेत. टी२० विश्वचषकात १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याच्यानंतर गेल २८ सामन्यांमध्ये ९२० धावा करत दुसऱ्या स्थानी आहे. तर दिलशान ३५ सामन्यांमध्ये ८९७ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
विराटला या विक्रमात अव्वलस्थानी विराजमान होण्यासाठी अजून २५० धावांची आवश्यकता आहे. जर त्याने यंदाच्या टी२० विश्वचषकात या धावांचा आकडा पार केला तर सर्वाधिक धावा करत जयवर्धनेचा ७ वर्षे जुना विक्रम उध्वस्त करेल.
कोहलीच्या एकंदर टी२० कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत ९० टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ५२ च्या प्रशंसनीय सरासरीने ३१५९ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वाधिक वैयक्तित खेळी नाबाद ९४ धावा इतकी राहिली आहे. अशात विराटने जर जुन्या रंगात परतत धावा फटकावल्या तर त्याला टी२० विश्वचषकातही रनमशीन बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलंदाजाचा आळशीपणा नडला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला, लाईव्ह सामन्यातील प्रसंगाने वेधले लक्ष
पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक