भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. गुरुवारी (19 डिसेंबर) भारतीय संघ ब्रिस्बेनहून मेलबर्नला रवाना झाला. यावेळी मेलबर्न विमानतळावर पोहचताच कोहलीचा एका महिला पत्रकाराशी जोरदार वाद झाला. वास्तविक, तिथे उपस्थित कॅमेरामन विराटच्या कुटुंबाचे फोटो काढत होता, ज्यामुळे विराट संतापला. त्यानं कॅमेरामनला फोटो काढू नका असं सांगितलं. दरम्यान, विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, विराट कोहली लवकरच आपल्या कुटुंबासह लंडनला शिफ्ट होणार आहे.
राजकुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, कोहलीनं निवृत्तीनंतर लंडनमध्ये स्थायिक होण्याची योजना आखली आहे. कोहली गेल्या काही वर्षांपासून बऱ्याचदा लंडनमध्ये दिसला आहे. त्याचा मुलाचा जन्मही तेथेच फेब्रुवारी महिन्यात झाला होता. विराट कोहली आणि पत्नी अनुष्काची लंडनमध्ये मालमत्ता आहे. शिफ्ट झाल्यानंतर ते कदाचित तिथेच राहतील.
राजकुमार शर्मा यांनी दैनिक जागरणला सांगितलं की, “विराट कोहली आपल्या मुलांसह आणि पत्नीसह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. तो भारत सोडून जात आहे आणि लवकरच येथे शिफ्ट होईल. क्रिकेट व्यतिरिक्त कोहली सध्या त्याचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे.”
राजकुमार शर्मा पुढे म्हणाले की, विराट अजूनही खूप तंदुरुस्त आहे. त्याचं अजून निवृत्तीचं वय झालेलं नाही. तो आणखी पाच वर्षे खेळेल. विराट कोहली 2027 विश्वचषकात खेळेल, असा दावाही राजकुमार शर्मा यांनी केला.
विराट कोहली त्याच्या कुटुंबासह गेल्या काही काळापासून लंडनमध्येच वास्तव्यास आहे. भारतानं जूनमध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर कोहली मायदेशी परतला. जुलैमध्ये तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला. यानंतर तो ऑगस्टपर्यंत कुटुंबासोबत राहिला. त्यानंतर त्यानं बांगलादेश-न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळली. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाच्या वेळी कोहली आणि त्याचं कुटुंब भारतात होतं.
हेही वाचा –
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!
मेलबर्न विमानतळावर राडा! विराट कोहलीला राग अनावर; नेमकं काय घडलं?
पुढचा नंबर विराटचा? अश्विनच्या निवृत्तीनंतर कोहली 2011 च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एकमेव सक्रिय खेळाडू