भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने आज (12 मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Virat Kohli Retired From Test Cricket) ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराट वयाच्या 36व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला. अलिकडेच रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता विराटही कसोटीतून निवृत्त झाला. विराटच्या निवृत्तीनंतर भारताला मोठा धक्का बसला आहे. अनेक क्रिकेट तज्ञ यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
राजकुमार शर्मा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहले की, “स्वप्न पहात असलेला तरुण मुलगा ते कसोटी क्रिकेटर…तुझा प्रवास प्रेरणादायी आहे विराट. तुला खेळताना पहाणे, तुझ्यातील आक्रमकता पहाणे, तुझ्यातील नेतृत्त्व पहाणे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. मला तुझा अभिमान आहे.” (Virat Kohli’s childhood coach Statement)
विराट कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने भारतासाठी 2011 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान विराटने 210 डावात 46.85च्या सरासरीने फलंदाजी करताना 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे. कसोटीमध्ये त्याने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत.






