मुंबई। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका बुधवारी संपली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा गोलंदाज केसरिक विल्यम्स यांच्यातील चकमक क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजक ठरली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराटने विल्सम्सच्या गोलंदाजीवर षटकार मारल्यावर नोटबूक सेलिब्रेशन केले होते. तर दुसऱ्या सामन्यात विल्यम्सने विराटला बाद करत तोंडावर बोट ठेवत शांत बसा अशी कृती करत सेलिब्रेशन केले होते.
त्यामुळे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात या दोघांपैकी कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर विराट यात यशस्वी झाला.
बुधवारी (11 डिसेंबर) भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात (3rd T20I) 67 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराटने 29 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले.
त्याच्या या खेळीदरम्यान विराटने विल्यम्सच्या 2 षटकांचा सामना केला. विराट आणि विल्यम्स या सामन्यात 16 व्या षटकात पहिल्यांदा आमने सामने आले. मात्र या षटकात गोलंदाजी करताना केवळ तीन धावा विल्यम्सने दिल्या.
पण मात्र नंतर विल्यम्सने टाकलेल्या 18 व्या षटकात विराट आणि केएल राहुल यांनी मिळून प्रत्येकी 1 षटकार मारताना 17 धावा काढल्या. विशेष म्हणजे या षटकातील चौथ्या चेंडूवर जेव्हा विराटने लांब षटकार मारला तेव्हा त्याला स्वत:चाच फटका पाहून आश्चर्य वाटले. त्याने स्वत:च मारलेल्या षटकाराला अविश्वसनीय फटका असल्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली.
विराटच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट संघाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/B579xOTgJUh/
बुधवारी पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विराटसह राहुल(91) आणि रोहित शर्मा(71) यांनीही अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे भारताने 20 षटकात 3 बाद तब्बल 240 धावांचा डोंगर रचला होता. त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 20 षटकात 8 बाद 173 धावाच करता आल्या.
https://twitter.com/Maha_Sports/status/1205060277344952320
https://twitter.com/Maha_Sports/status/1205038081331449856