दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या पहिल्या क्लालिफायर सामन्यात रविवारी (८ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. चेन्नईने या सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने विजयी चौकार मारला. यानंतर चेन्नई संघाबद्दल आणि धोनीबद्दल विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीनेही खास ट्वीट केले आहे.
या सामन्यात चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत चेन्नईला विक्रमी नवव्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. धोनी या सामन्यात चेन्नईला ११ चेंडूत २४ धावांची गरज असताना मैदानात आला होता. त्याने ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १८ धावा केल्या.
धोनीच्या या आक्रमक खेळीचे कौतुक करताना विराटने ट्वीट केले की ‘आणि किंग परतला. क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर. माझ्या जागेवरुन त्याने मला उडी मारण्यास पुन्हा एकदा भाग पाडले.’
Anddddd the king is back ❤️the greatest finisher ever in the game. Made me jump Outta my seat once again tonight.@msdhoni
— Virat Kohli (@imVkohli) October 10, 2021
विराटचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटने अनेक धोनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे विराटला सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एलिमिनेटरचा सामना खेळायचा आहे.
धोनीने सामना केला फिनिश
दिल्लीने चेन्नईसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून रॉबिन उथप्पा (६३) आणि ऋतुराज गायकवाड यांनी अर्धशतके करत संघाला भक्कम स्थितीत उभे केले होते. पण, मधल्या षटकात चेन्नईने लागोपाठ काही विकेट्स गमावल्या. त्यामुळे सामन्यांत रोमांच आला होता. त्यातच अखेरच्या २ षटकांत २४ धावांची गरज असताना लयीत खेळणारा ऋतुराज ७० धावांवर बाद झाला.
त्यामुळे, धोनी ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तो जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नईला ११ चेंडूत २३ धावा हव्या होत्या. यावेळी त्याच्यासह मोईन अली फलंदाजी करत होता. १९ व्या षटकात धोनीने एक षटकार, तर मोईनने चौकार मारत एकूण ११ धावा काढल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात चेन्नईला १३ धावांची गरज होती.
पण, टॉम करन गोलंदाजी करत असलेल्या या षटकात मोईन पहिल्याच चेंडूवर १६ धावांवर बाद झाला. मात्र, नंतर धोनीने तीन चौकार खेचत चेन्नईला विजय मिळवून दिला. या षटकातील चौथा चेंडू करनने वाईड टाकला होता. त्यापूर्वी धोनीने सलग २ चौकार मारले होते. त्यामुळे चेन्नईला ३ चेंडूत ४ धावांची गरज असताना धोनीने पुन्हा एकदा चौकार खेचला आणि चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
गेले अनेक दिवसांपासून धोनी त्याच्या धीम्या फलंदाजीसाठी टीकेचा धनी ठरला होता. मात्र, या सामन्यात त्याने केेलेल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत.
दिल्लीकडून पंत, शॉची अर्धशतकं
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, दिल्लीकडून पृथ्वी शॉने आक्रमक खेळ करत दिल्लीला चांगली सुरुवात दिली होती. त्याने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार रिषभ पंतने आपल्या खांद्यावर घेतली. या दोघांनी ८३ धावांची भागीदारी केली.
पंतने अर्धशतकही पूर्ण केले. तो ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. तर हेटमायरने ३७ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू
टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अंतिम १५ जणांचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची धूरा
प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी