क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. भारतीय संघाने या मैदानावर आजपर्यंत १९ कसोटी सामने खेळताना केवळ तीन विजय मिळवले आहेत आहेत. भारताने १९८६ मध्ये लॉर्ड्सवर प्रथमच कसोटी जिंकल्यावर २८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने २०१४ मध्ये आपला दुसरा विजय मिळवला होता. १९८६ मध्ये कपिल देव आणि २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली हे विजय संपादन केले गेले होते.
आता सात वर्षांनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने या मैदानावर अविस्मरणीय विजयाची नोंद केली. या विशेष विजयानंतर विद्यमान कर्णधार विराट कोहलीला माजी कर्णधार धोनीचीही आठवण झाली. २०१४ मध्ये जेव्हा भारताने लॉर्ड्स कसोटी जिंकली, तेव्हा विराटदेखील त्या संघाचा भाग होता.
‘तो विजय खास होता’
लॉर्ड्स कसोटीतील विजयानंतर बोलताना भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला, “या मैदानावर अखेरचा विजय मिळवला होता तेव्हा मी एमएसच्या नेतृत्वाखाली खेळलेलो. तो एक अतिशय खास विजय होता. परंतु, हा आजचा विजय काहीसा विशेष आहे. कारण, ६० षटकांमध्ये निकाल लागणे आनंदायी होते. मोहम्मद सिराज लॉर्ड्सवर पहिली कसोटी खेळत होते आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. ६० षटकात विजय मिळवण्याचे आम्ही ठरवलेले. नवीन चेंडूने सुरुवातीला बळी मिळवणे खूप गरजेचे होते.”
मागील विजयावेळी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने या मैदानावर शतक झळकावलेले. तसेच वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एका डावात सात गडी बाद केलेले. हे दोघे या सामन्याचा देखील भाग होते.
अनुभवी खेळाडूंचे विजयात मोलाचे योगदान
रहाणेने यावेळीही भारतासाठी दुसऱ्या डावात अर्धशतक केले, तर इशांत शर्माने सामन्यात एकूण पाच बळी घेतले. दुसऱ्या डावात ५५ धावांवर तीन गडी गमावल्यानंतर भारत अडचणीत होता. मात्र, त्यानंतर रहाणेने चेतेश्वर पुजारासह शतकी भागीदारी करून भारताला सामन्यात परत मिळवून दिले. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जो रुटचे ‘ते’ तीन निर्णय, जे इंग्लंड संघाला लॉर्ड्स कसोटीत पडले महागात
लॉर्ड्स मोहिम फत्ते करणाऱ्या सर्व ११ शिलेदारांच्या प्रतिक्रिया, वाचा सविस्तर






