टी२० विश्वचषक २०२१ मध्ये आपली मोहीम सुरू करण्यापूर्वी भारतीय संघ सराव सामन्यात इंग्लंडशी भिडत आहे. दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने नाणेफेकीदरम्यान भारताच्या विश्वचषक मोहिमेबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला.
विश्वचषक मोहिमेबद्दल विराटचा खुलासा
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यावेळी विराट भारतीय संघाच्या नवीन जर्सीत मैदानावर उतरला. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यावेळी समालोचकांनी त्याला तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत विचारले असता तो म्हणाला,
“आयपीएलपूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या. मात्र, आता राहुलपेक्षा इतरत्र कोठे पाहणे चुकीचे ठरेल. रोहितच्या जागेविषयी शंका नाही. तो दर्जेदार खेळाडू आहे. ते दोघे संघाला सलामी देतील आणि मी तिसर्या क्रमांकावर खेळेल.”
विराटने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध सलामीवीर म्हणून सुरुवात केली होती. तसेच, आयपीएलमध्येही तो डावाची सुरुवात करत होता. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर विश्वचषकात सलामी देण्याचा मनोदय व्यक्त केलेला.
राहुलने गाजवली आयपीएल
आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करणाऱ्या केएल राहुलने आयपीएल २०२१ मध्ये शानदार कामगिरी केली. सलामीवीर म्हणून खेळताना त्याने १३ सामन्यात ६२.६० च्या सरासरीने व १३८ च्या स्ट्राईक रेटने ६२६ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे विश्वचषकात तोच सलामीवीर म्हणून खेळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. विराटच्या या स्पष्टीकरणामुळे आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भारतीय गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी
इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला जम न बसू देता भारतीय गोलंदाजांनी नियमित अंतराने बळी मिळवून दिले. मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी मिळवले. इंग्लंडसाठी जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. इंग्लंडने सर्व फलंदाजांचा थोड्याथोड्या योगदानाच्या जोरावर निर्धारित २० षटकात १८८ धावा बनविल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
युएईत विराटला मिळणार का ‘ती’ संधी; अकरा वर्षांपासून पाहतोय वाट
असंही होऊ शकत! नेदरलँड्सच्या पाच फलंदाजांनी भोपळा न फोडल्याने घडला मोठा इतिहास
पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात चार चेंडूत चार बळी घेणाऱ्या कॅम्फरबद्दल ‘या’ गोष्ट माहितेय का?