विरेंद्र सेहवाग म्हणजे एक भारतीय क्रिकेटमधील वादळ होतं. त्याने त्याच्या अनोख्या आणि आक्रमक फलंदाजी शैलीने सलीमीची परिभाषाच बदलून टाकली. त्याचा अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न असायचा. त्याच्याप्रमाणे अनेक खेळाडूंनी खेळण्याचा प्रयत्नही केला, पण ज्याप्रकारे त्याला चेंडू फटकावणे जमायचे तसे सर्वांनाच जमले, असे नाही. तब्बल 14 वर्ष विरेंद्र सेहवाग वादळ आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घोंगावत होतं. या वादळाने अनेक देशांचे गोलंदाज त्रस्त होते. पण कसोटी क्रिकेटमध्ये हे वादळ सर्वात आधी उठले ते आजच्याच दिवशी (3 नोव्हेंबर) 2001 मध्ये ब्लोएमफाॅंटेन येथे आणि या वादळाचा पहिला तडाखा बसला तो दक्षिण आफ्रिकेला. अर्थात 3 नोव्हेंबर 2001 रोजी सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोएमफाॅंटेन येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
या सामन्यात त्याने 173 चेंडूत 60.69 च्या स्ट्राइक रेटने 105 धावा केल्या होत्या. त्यात तब्बल 19 चौकारांचा समावेश होता.
पहिलाच कसोटी सामना खेळताना केलेल्या त्याच्या या खेळीने त्याने संपूर्ण क्रिकेट जगताला त्याची दखल घ्यायला भाग पाडले. त्याच्या रुपात पुढे जाऊन भारताला कसोटी सामना जिंकून देणारा एक खमका फलंदाज सापडला. ज्याने त्याच्या आक्रमक फलंदाजीने त्याची वेगळीच ओळख निर्माण केली.
#OnThisDay in 2001 @virendersehwag made his Test debut against South Africa and scored a century in a stand of 220 with @sachin_rt! pic.twitter.com/hpJyCCqKrH
— ICC (@ICC) November 3, 2017
क्रिकेट कारकिर्दीत स्फोटक सलामीवीर फलंदाज म्हणून ओळख निर्माण केलेल्या सेहवागने कसोटीमध्ये पदार्पणाच्या सामन्यात मात्र, 6व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी सामन्यात जॅक कॅलिसने भारताचा त्यावेळीचा कर्णधार सौरव गांगुलीला बाद केले होते. तेव्हा भारताची धावसंख्या ही 4 बाद 68 धावा होती. अशा दबावाच्या परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सेहवागने शतकी खेळी करत भारताला सावरले होते.
या सामन्यात सेहवाग जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा मैदानावर असा खेळाडू दुसऱ्या बाजूला होता ज्याची सेहवाग अक्षरश: एकेकाळी पूजा करत असे. तो खेळाडू होता अर्थातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर.
या सामन्यात एकप्रकारे ही गुरु-शिष्याची जोडीच मैदानात होती. या दोघांनीही अफलातून फलंदाजी करत वैयक्तिक शतक फलकावर लावले.
शतकी खेळी करतानाच भारतीयांचा तेव्हा हिरो असलेल्या सचिन आणि भविष्यातील सुपर स्टार सेहवागने 5व्या विकेटसाठी 220 धावांची भागीदारीही रचली होती. पण मखाला एनटीनीने सचिनला 155 धावांवर बाद केले आणि ही जोडी फोडली.
पण सेहवागने त्यानंतरही किल्ला लढवत ठेवला आणि दिपदास गुप्ताबरोबर 6 व्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली. मात्र दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज शॉन पोलॉकने सेहवागला 105 धावांवर त्रिफळाचीत केले. पण तोपर्यंत सेहवागने भारताला पहिल्या डावात 350 धावांचा टप्पा पार करुन दिला होता.
या शतकी खेळी नंतर सेहवागने कारकिर्दीत पुन्हा पाठीमागे वळून पाहिलेच नाही. याच सामन्यात सेहवागने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळताना 6 चौकारांसह 36 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. पण पुढे हा सामना भारतीय संघ 9 विकेट्सने पराभूत झाला.
मात्र या सामन्यातून भारताला सेहवाग नावाचा हिरा सापडला. पुढे जाऊन सेहवागला सलामीला फलंदाजीला पाठवण्याचा गांगुलीने निर्णय घेतला आणि सेहवागनेही या निर्णयाला योग्य ठरवत एक आक्रमक सलामीवीर म्हणून क्रिकेट जगतात ओळख मिळवली.
कसोटी जिंकून देणार्या खेळाडूचे पदार्पण…
२००१मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध @virendersehwagने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात दणदणीत शतकं करत जगाला आपली दखल घ्यायला लावली. पुढे एक कसोटी जिंकून देणारा खेळाडू ही सेहवागची जगाला ओळख झाली. #म #मराठी pic.twitter.com/I8Hdc26Hj7— Sharad Bodage (@SharadBodage) November 3, 2019
त्याच्या आक्रमक फलंदाजीबद्दल एका मुलाखतीत गांगुली म्हणाला होता, ‘सलामीवीरांचे काम असते चेंडू सोडून सोडून जूना करणे, पण सेहवागचे काम होते चेंडू मारुन मारुन जूना करणे.’
सेहवागने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 104 कसोटी सामने खेळताना 49.34 च्या सरासरीने आणि चक्क 82.23 च्या स्ट्राईक रेटने 8586 धावा केल्या. विशेष म्हणजे कसोटीमध्ये 8000 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट सेहवागचा आहे. आजही त्याच्या या विक्रमाच्या आसपास कोणी पोहचलेले नाही.
भारताचा स्फोटक सलामीवीर म्हणून क्रिकेटमध्ये नाव मिळवलेल्या सेहवागने अखेर 20 ऑक्टोबर 2015 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयामुळे जगभरातील क्रिकेटचे चाहते निराश झाले होते.
वाचा –
-सासू-सुनेच्या भांडणामुळे सेहवागने केलं ‘हे’ काम, मग काय थेट आयसीसीने दिली चेतावणी
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
-अनेक दिग्गजांनाही न जमलेला असा खास पराक्रम करणारा वीरेंद्र सेहवाग एकमेव भारतीय क्रिकेटपटू