आयपीएल २०२१ मधील पाचवा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १५३ धावांचा बचाव करताना १० धावांनी खळबळजनक विजय साजरा केला. मुंबईच्या या विजयानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एक मजेदार व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत मुंबई इंडियन्सचे अभिनंदन केले.
सेहवागने केले मजेदार ट्विट
चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात सामन्याचे पारडे वारंवार झुकत राहिले. अखेरीस विजय कोलकाता नाईट रायडर्सच्या दृष्टिक्षेपात होता. मात्र, मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकात कोलकात्याच्या फलंदाजांना ३१ धावाही काढू दिल्या नाहीत व १० धावांनी संघाला विजय मिळवून दिला. मुंबईचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय आहे तर, कोलकात्याला हा पहिला पराभव स्वीकारावा लागला.
मुंबईच्या या विजयानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने एका व्हिडिओचे ट्विट केले. यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सची तुलना डब्ल्यूडब्ल्यूईचा दिग्गज खेळाडू अंडरटेकरसोबत केली. सेहवागने शेअर केलेल्या ट्विटमध्ये, अंडरटेकर निपचीत पडलेला असताना अचानक उभा राहून प्रतिस्पर्धी खेळाडूचा गळा पकडून त्याला पछाडतो असे दिसत आहे.
सेहवागने या ट्विटला कॅप्शन देताना लिहिले, ‘अखेरच्या पाच षटकांत मुंबईने कोलकात्याला असे केले.’ सेहवागच्या या ट्विटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.
https://twitter.com/virendersehwag/status/1382038697525141504
मुंबईने मिळविला रोमहर्षक विजय
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने अफलातून मुसंडी मारत विजय साजरा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकात १५२ धावांची मजल मारली. कोलकातासाठी अष्टपैलू आंद्रे रसेलने १५ धावांत ५ बळी आपल्या नावे केले होते.
प्रत्युत्तरात, कोलकताला शुबमन गिल व नितीश राणा यांनी अर्धशतकी सलामी दिली. मात्र, युवा फिरकीपटू राहुल चहरने २७ धावांत चार गडी बाद करत सामना रंगतदार बनवला. अखेरच्या ५ षटकात ३१ धावा हव्या असतानाही मुंबईचा गोलंदाजांनी किफायतशीर गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘त्या’ अपमानाने बदलले हर्षल पटेलचे आयुष्य
‘हे’ तीन खेळाडू राजस्थान रॉयल्स संघात घेऊ शकतात दुखापतग्रस्त बेन स्टोक्सची जागा
विराटची वनडे क्रमवारीतील १२५८ दिवसांची बादशाहत संपली, ‘हा’ फलंदाज आला पहिल्या क्रमांकावर






