काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीची रवी शास्त्रींबरोबरची लढ गमावली होती. आता त्या सर्व घटनेबद्दल सेहवागने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सांगितले आहे की, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदा मिळविण्यासाठी तो कधीच उत्सुक नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या सदस्यांना आग्रह केल्यानंतरच त्याने अर्ज केला होता.
सेहवाग असे ही म्हणाला कि त्याने अर्ज करण्याआधी विराट कोहली व रवी शास्त्री या दोघांशीही चर्चा केली होती आणि रवी शास्त्री तेव्हा म्हणाले होते की ते अर्ज करणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अमिताभ चौधरी यांच्या विनंतीवरून सेहवागने अनिल कुंबळेच्या जागेसाठी अर्ज केला. शास्त्रीनी अर्ज करण्याआधी असे वाटत होते की सेहवागच भारताचा मुख्य प्रशिक्षक होणार पण बीसीसीआयने अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवली आणि शास्त्रींनी अर्ज केला आणि सर्व गणिते बदलली.
सेहवाग म्हणाला:
“मी विचार केला कि बीसीसीआय स्वतः मला विनंती करत असेल तर मी त्यांना मदत केली पाहिजे. मी स्वत:हुन अर्ज करण्याचा कधीच विचार केला नाही आणि मी भविष्यात परत कधीही अर्ज करणार नाही. मी विराट कोहलीशी देखील बोललो होतो, त्यानेही मला अर्ज करण्यास सांगितले. तेव्हाच अर्ज केला. तसा तर मला कधीच भारतीय प्रशिक्षक पदामध्ये रस नव्हता.”
“जेव्हा मी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ दरम्यान इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा मी रवी शास्त्रीनां विचारले कि त्यांनी अजून अर्ज का केला नाही. तर ते म्हणाले एकदा केलेल्या चुकीची पुनरावृत्ती ते करणार नाही.”
“जर रवी शास्त्रीनी आधी अर्ज केला असता, तर मी कधीच अर्ज केला नसता.”
तथापि, शास्त्रींची नेमणूक बीसीसीआयसाठी मास्टरस्ट्रोक ठरली आहे. विराट कोहलीच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध सर्वच फॉरमॅटमध्ये निर्भेळ यश मिळवले. आता तसेच काहीशे यश भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवण्याचा प्रयत्न करेल.