एकेकाळी टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला जगातील भलेभले गोलंदाज घाबरायचे. आता वीरेंद्र सेहवागच्या मुलानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. या दिग्गज फलंदाजाचा मुलगा आर्यवीर सेहवाग यानं स्फोटक पद्धतीनं द्विशतक झळकावत गोलंदाजांचा धुव्वा उडवला!
वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरनं कूचबिहार ट्रॉफी 2024 मध्ये खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीच्या या 17 वर्षीय खेळाडूनं मेघालय विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात जबरदस्त द्विशतक झळकावलं. आर्यवीरनं आपल्या उत्कृष्ट खेळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कूचबिहार करंडक 19 वर्षांखालील स्तरावरील बहु-दिवसीय स्पर्धेत मेघालय विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर्यवीरनं 229 चेंडूंचा सामना करत जबरदस्त द्विशतक झळकावलं. या खेळीदरम्यान त्यानं 34 चौकार आणि 2 षटकार मारून चाहत्यांची मनं जिंकली. ज्युनियर सेहवागच्या या खेळीनं चाहत्यांना वीरेंद्र सेहवागच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आर्यवीर सेहवागला या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दिल्लीच्या प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यात संघात घेण्यात आलं. वडिलांप्रमाणेच हा उजव्या हाताच्या फलंदाज सलामीला येतो. त्यानं सहकारी सलामीवीर अर्णव बग्गासह पहिल्या विकेटसाठी 180 धावा जोडल्या, ज्यामध्ये अर्णवनं 114 धावा केल्या. यानंतर आर्यवीरनं वंश जेटली (43) सोबत 100 धावांची भागीदारी केली. यानंतर त्यानं धन्व नाकरासोबत तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. धन्वनं 98 धावा केल्या.
वीरेंद्र सेहवागनं एकदा एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, तो त्याच्या मुलावर क्रिकेटर होण्यासाठी कोणताही दबाव टाकत नाही. 2019 मध्ये सेहवाग म्हणाला होता, “मला त्याच्यामध्ये दुसरा वीरेंद्र सेहवाग बघायचा नाही. तो विराट कोहली किंवा हार्दिक पांड्या किंवा एमएस धोनीही बनू शकतो. माझ्या त्याच्यावर क्रिकेटर बनण्याचा दबाव नाही. तो त्याचं करिअर निवडण्यास मोकळा आहे. आम्ही शक्य तितकी मदत करू. पण मुख्य म्हणजे तो एक चांगला माणूस बनावा, त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
हेही वाचा –
1947 पासून भारतानं ऑस्ट्रेलियात फक्त इतके कसोटी सामने जिंकले, प्रत्येक मालिकेचा निकाल जाणून घ्या
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहित शर्मा या दिवशी ऑस्ट्रेलियात दाखल होणार
लिस्ट जाहीर! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये हे दिग्गज कॉमेंट्री करताना दिसतील