इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे. ओव्हलच्या मैदानावर विजय मिळवून भारतीय संघाने इतिहासाला गवसणी घातली आहे.
या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाने तुफान फटकेबाजी करत ४६६ धावांचा डोंगर उभारला होता. यासह इंग्लंड संघाला विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु इतर कुठल्याही फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या २१० धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे, जेव्हा भारतीय संघाने ओव्हल आणि लॉर्ड्स या दोन्ही ऐतिहासिक मैदानांवर एकाच कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. इंग्लंड संघाला ओव्हल आणि लॉर्ड्सच्या मैदानावर पराभूत करत भारतीय संघाने २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघाने देखील असा कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने हा कारनामा ५ वेळेस केला आहे. तर वेस्ट इंडिज संघाने हा कारनामा ४ आणि पाकिस्तान संघाने ३ वेळेस केला आहे. तसेच न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाने प्रत्येकी १ वेळेस असा पराक्रम केला आहे.
एकाच कसोटी मालिकेत ओव्हल आणि लॉर्डसच्या मैदानावर कसोटी सामन्यात विजय मिळवणारे पाहुणे संघ
ऑस्ट्रेलिया (५ वेळेस) – १९३०,१९४८,१९७२,२००१,२०१५
वेस्ट इंडिज (४ वेळेस) -१९५०,१९७३,१९८४,१९८८
पाकिस्तान (३ वेळेस) -१९९२,१९९६,२०१६
न्यूझीलंड (१ वेळेस) १९९९
दक्षिण आफ्रिका (१ वेळेस) -२०१२
भारत (१ वेळेस) -२०२१*
भारतीय संघाचा १५७ धावांनी दणदणीत विजय
भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी अर्धशतकं झळकावले होते. परंतु, ते दोघेही अर्धशतकांचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार जो रूट देखील स्वस्तात माघारी परतला होता. तसेच इंग्लंड संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर गुंडाळला होता. यासह भारतीय संघाने या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित सुपरहिट! सामनावीराचा पुरस्कार मिळवत ‘या’ यादीत युवराजला टाकले मागे
आशियाचा किंग! ओव्हल कसोटीतील विजयासह विराट ‘हा’ कारनामा करणारा ठरला पहिलाच आशियाई कर्णधार