Loading...

हा दिग्गज म्हणतो, रोहित शर्मा नाही तर हा फलंदाज आहे सेहवागप्रमाणे निडर

भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालचे कौतुक केले आहे. लक्ष्मणने म्हटले आहे की कणखर मानसिकता आणि स्थिरता ही मयंकची सर्वात मोठी ताकद आहे. तसेच लक्ष्मणने मयंक विरेंद्र सेहवागप्रमाणे निडरतेने खेळतो असेही म्हटले आहे.

विशाखापट्टणमला २ ते ६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीत मयंकने पहिल्या डावात २१५ धावांची खेळी केली होती. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिलेच द्विशतक होते. हे द्विशतक करताना त्याने रोहित शर्माबरोबर ३१७ धावांची सलामी भागीदारी केली होती.

मयंकबद्दल स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना लक्ष्मण म्हणाला, ‘तो चांगला फलंदाज आहे आणि त्याचा या सामन्यात खेळताना दृष्टीकोन देशांतर्गत क्रिकेट खेळताना असतो तसा होता. साधारणत: खेळाडू देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांच्या शैलीत बदल करतात. पण त्याने दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची शैली सारखीच ठेवली आहे.’

‘त्याची कणखर मानसिकता आणि स्थिरता त्याची ताकद आहे आणि तो त्याच्या आवडत्या विरेंद्र सेहवागप्रमाणे निडर होऊन खेळतो.’

लक्ष्मणबरोबरच भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेही मयंकचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की ‘मयंक अगरवाल चांगला फलंदाज आहे. तो त्याचे पायाच्या हालचाली चांगल्या करतो. तो पुढे येऊन फटके खेळतो आणि रिव्हर्स स्विपही चांगला खेळतो. त्याच्याकडे अनेक फटके आहेत जे तो गरज असेल तेव्हा खेळतो.’

‘तो मेहनती खेळाडू आहे. तो बरेच देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे आणि तो खूप काही शिकला आहे. तो उशीरा आला पण त्याला खूप ज्ञान आणि अनुभव आहे. तसेत त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीची किंमत माहित आहे.’

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना भारताने २०३ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता पुढील कसोटी सामना १०
ऑक्टोबरपासून पुण्यात होणार आहे.

Loading...
You might also like
Loading...