इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर, यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. तर काही खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. १७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. हे सामने खेळण्यासाठी श्रीलंका संघातील दिग्गज खेळाडूने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे.
श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने, “मी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे मनापासून आभार मानतो. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, माझा संघ प्लेऑफमध्ये चांगली कामगिरी करेल. अशी आशा व्यक्त करतो की, यावर्षी आम्ही जेतेपद मिळवू. माझा या संघासोबतचा अनुभव खूप चांगला होता. आम्ही मैत्रीपूर्ण वातावरणात राहिलो. ही संधी देण्यासाठी मी फ्रँचाइजीचे मनापासून आभार मानतो.”
आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने वनिंदू हसरंगाला संधी दिली होती. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाने माघार घेतल्यानंतर, बदली खेळाडू म्हणून वनिंदू हसरंगाला स्थान देण्यात आले होते. वनिंदू हसरंगा एक अप्रतिम फिरकी गोलंदाज आहे. तसेच फलंदाजीमध्ये देखील तो मोलाचे योगदान देत असतो. भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत, वनिंदू हसरंगाने अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजी करत श्रीलंका संघाला विजय मिळवून दिला होता.
https://www.instagram.com/p/CU2zXP9hvCi/?utm_medium=copy_link
तसेच क्वालिफायरच्या दुसऱ्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवणार त्या संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुःखद! हृदयविकाराच्या झटक्याने ‘या’ पंचांचा मृत्यू, नुकतीच डोळ्याला चेंडू लागल्याने झाली होती दुखापत
चेन्नईविरुद्धच्या २ चूका कर्णधार रिषभला पडल्या भलत्याच महागात, नाही तर आता फायनलमध्ये असती दिल्ली!