इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 8 वा सामना शुक्रवार 28 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे सामने जिंकलेले आहेत,त्यामुळे सामना अटीतटीचा होताना दिसणार आहे. पण आरसीबी वर थोडासा जास्त दबाव राहील कारण सामना चेन्नईच्या घरेलू मैदानावर खेळला जाणार आहे. त्यामुळे इथे सीएसकेचा पराभव करणे त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉटसनने आरसीबीला सांगितले आहे की त्यांनी जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे?
शेन वॉटसन आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या दोन्ही संघांसाठी खेळलेला आहे. त्याने धोनी आणि विराट दोघांसोबत सुद्धा ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. त्याने शुक्रवारी होणाऱ्या सामन्याआधी म्हटले आहे की, चेपॉक मध्ये खेळणं कायमच कोणत्याही संघासाठी अडचणीचं ठरलं आहे.
शेन वॉटसन याने जिओहॉटस्टार वर म्हटले, ज्या प्रकारे चेन्नई सुपर किंग्स संघाचे गोलंदाज आहेत हे आरसीबी संघासाठी एक मोठं आव्हान असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जर सामना जिंकायचा असेल तर आरसीबीला त्यांच्या संघाच्या संयोजनामध्ये बदल करावा लागेल, पण यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये.
वॉटसन मानतो की, चेपॉक वर चेन्नईच्या दबदब्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे फिरकीपटू आहेत. चेन्नई संघ असा आहे की ते त्यांच्या घरेलू मैदानावर चांगलं प्रदर्शन करतील. तर पुढे म्हणाला रवींद्र जडेजा, आर अश्विन, नूर अहमद यांना पाहिलं तर, त्यांनी पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. त्याच सोबत ते या खेळपट्टीवर सुद्धा उपयोगी ठरतील. नूर अहमदमुळे संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. संघाला आता माहिती आहे की त्यांच्याकडे विकेट घेण्यासाठी अजून पर्याय आहेत.
नूर अहमदने मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिल्या सामन्यात 4 षटकात 18 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात चेन्नईने मुंबईला 4 विकेट्सने पराभूत केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी पहिल्या सामन्यात केकेआरचा पराभव केला होता.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु सामना 28 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. नाणेफेक 7 वाजता होऊन सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होईल.