3 जानेवारी रोजी बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज केले (Kolkata knight riders release mustfijur rehman). आयपीएल 2026 च्या लिलावात त्याला 9.2 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. आता मुस्तफिजुरच्या एका सहकारी खेळाडूने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
केकेआरने संघातून काढल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी, मुस्तफिजुरने ‘बांगलादेश प्रीमियर लीग’मध्ये (BPL) रंगपुर रायडर्ससाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. मात्र, या विजयानंतर त्याचा सहकारी खेळाडू नुरुल हसन याने मुस्तफिजुरच्या मानसिक स्थितीबद्दल मोठे विधान केले आहे.
रंगपुर रायडर्सचा कर्णधार नुरुल हसन म्हणाला, मुस्तफिजुर हा एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि त्याने ते वारंवार सिद्ध केले आहे. आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो वरून शांत दिसत असला तरी, केकेआरने त्याला संघातून काढल्याच्या बातमीने तो मनातून पूर्णपणे तुटला होता.
तो या सर्व यशाचा मानकरी आहे आणि त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तो नेहमीच बांगलादेशसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. या वादाचा परिणाम केवळ आयपीएलवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही झाला आहे. 2025 मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात होणारी क्रिकेट मालिका पुढे ढकलण्यात आली होती. आता ही मालिका पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. बांगलादेशने त्यांच्या देशात आयपीएल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे.






