रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान संघाला 5 विकेट्सने पराभूत केले. तसेच, दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव होताच मोहम्मद शमी याने शोएब अख्तर याला ट्वीट करत ट्रोल केले, ज्याची भलतीच चर्चा झाली. अशात शमीच्या ट्वीटवर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि वसीम अक्रम यांची प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे. चला तर जाणून घेऊया हे दोन खेळाडू काय म्हणाले आहेत…
काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला की, “आम्ही क्रिकेटपटू या खेळाची ओळख आहोत. परस्पर मतभेद संपवण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आपण एकमेकांचे शेजारी आहोत. लोकांमध्ये द्वेष पसरेल अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. आपणच जर असं केलं, तर सामान्य व्यक्तींकडून आपण काय अपेक्षा ठेवावी?”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “क्रिकेट हा खेळ दोन देशातील कटुता कमी करू शकतो. त्यांच्यासोबत आम्हाला खेळायचे आहे. त्यांना पाकिस्तानात खेळताना पाहायचे आहे. जर तुम्ही निवृत्त खेळाडू असाल, तरीही तुमच्याकडून अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. मात्र, तुम्ही सध्याच्या क्रिकेटमध्ये खेळत आहात, तेव्हा या सर्व गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे.”
वसीम अक्रम यांची प्रतिक्रिया
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याच्या ट्वीटवर दिलेले प्रत्युत्तर पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अक्रम (Wasim Akram) यांना आवडले नाही. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “अशावेळी आपण तटस्थ राहिलो पाहिजे. भारतीय आपल्या देशासाठी देशभक्त आहेत. याची मला काहीच अडचण नाही आणि आम्हीही आमच्या देशाचे देशभक्त आहोत. मात्र, जखमेवर मीठ चोळणं, ट्वीटवर ट्वीट करणं… या गोष्टी टाळल्या पाहिजेत.”
यादरम्यान पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार मिस्बाह उल हक हेदेखील उपस्थित होते. त्यांनी यावर म्हटले की, “फक्त काही लाईक्ससाठी तुम्ही असे ट्वीट केले नाही पाहिजेत. क्रिकेटपटू कोणत्याही देशासाठी खेळत असला, तरीही आपण सर्वजण एक कुटुंब आहोत. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. अशावेळी आपली मतं मांडताना विचार केला पाहिजे. आपलीदेखील काहीतरी जबाबदारी आहे.”
काय होतं मोहम्मद शमीचं ट्वीट?
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा इंग्लंड संघाकडून पराभव झाला. यानंतर शोएब अख्तर याला मोहम्मद शमी याने ट्रोल केले होते. शमीने ट्वीट करत अख्तरच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत लिहिले होते की, “माफ कर भावा, यालाच कर्म म्हणतात.”
Sorry brother
It’s call karma 💔💔💔 https://t.co/DpaIliRYkd
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 13, 2022
भारतीय चाहत्यांना हे ट्वीट भलतेच आवडले होते, पण पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी यावर आपला राग व्यक्त केला. (wasim akram and Shahid Afridi reaction on mohammed shami karma tweet)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनच्या पदार्पणाच्या वयात ‘या’ केली 407 धावांची खेळी, 50 षटकांच्या सामन्यात घडला इतिहास
आयपीएल 2023पूर्वी गुजरातच्या गोटातून मोठी बातमी, ‘या’ स्टार खेळाडूला केले रिटेन