आयपीएल 2025 पूर्वी संघांमध्ये अनेक बदल होणार आहेत, मग ते खेळाडू असतील किंवा सपोर्ट स्टाफ. आता बातमी येत आहे की, पंजाब किंग्जचा संघ नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. संघ सध्याचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांचा कार्यकाळ वाढवणार नाही.
रिपोर्ट्सनुसार, पंजाब किंग्ज एखाद्या भारतीय प्रशिक्षकाच्या शोधात आहे आणि या शर्यतीत भारताचे माजी फलंदाज वसीम जाफर यांचं नाव आघाडीवर आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, वसीम जाफर पंजाब किंग्जचे नवे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. वसीम जाफर यांनी यापूर्वी देखील पंजाब संघासोबत काम केलं आहे. ते 2019 ते 2021 दरम्यान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. याशिवाय 2023 हंगामात त्यांनी संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम केलं आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि विदर्भाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 46 वर्षीय वसीम जाफरच्या नावे रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्यांनी भारतीय संघासाठी 31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जाफर यांनी कोचिंगमध्ये प्रवेश केला. ते बांग्लादेशच्या युवा संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते. याशिवाय ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तराखंड आणि ओडिशा संघाचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत.
पंजाब किंग्जचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे हेड कोच म्हणून आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. ते आयपीएल 2023 पूर्वी पंजाब संघात सामिल झाले. मात्र पंजाब किंग्जसोबत त्यांचा कार्यकाळ काही विशेष राहिला नाही. 2023 मध्ये संघ 8व्या तर 2024 हंगामात संघ 9व्या स्थानावर राहिला. त्यामुळे आता पंजाब किंग्ज ट्रेव्हर बेलिस यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या मुडमध्ये नाही. संघ आता एखाद्या भारतीय मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“विराट कोहली कर्णधार नसून सुद्धा तो…”, बुमराहने सांगितली टीम इंडियातील आतली गोष्ट
‘आम्ही चांगले लोक आहोत…’, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी पाकिस्तान क्रिकेटपटूचे अनोखे विधान
टाॅस होताच हृदय तुटणार! पहिल्या टी20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून हे 3 खेळाडू होणार बाहेर!