भारतीय क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला. या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये भारतीय संघाला मोठी यश मिळाले. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे व टी२० मालिका आपल्या नावे केल्या. भारताच्या या यशात अष्टपैलू हार्दिक पंड्याने मोलाचे योगदान दिले. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरनेही त्याचे कौतुक करताना मोठे वक्तव्य केले आहे.
हार्दिकची अष्टपैलू कामगिरी
मागील काही काळापासून हार्दिक चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. त्याच्या नेतृत्वात प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्सने विजेतेपद आपल्या नावे केले. त्यानंतर हार्दिकला आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. इंग्लंड दौऱ्यावरील टी२० मालिकेतही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली. अखेरीस इंग्लंड विरुद्धच्याच वनडे मालिकेत तो मालिकावीर ठरला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने ४ बळी व ७१ धावाही केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर अनेक जणांनी कौतुकाचा वर्षाव केला.
हार्दिकचे कौतुक करताना भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासिम जाफरनेही अनेक कौतुकास्पद शब्द वापरले. एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना तो म्हणाला,
“हार्दिक पंड्यामध्ये कपिल देव यांचा विक्रम मागे टाकण्याची क्षमता आहे. कपिल देव हे खूप मोठे नाव आहे. त्यामुळे एवढ्या लवकर काही बोलणे योग्य होणार नाही. तरीही, तो अशीच गोलंदाजी करत राहिला तर हे करू शकतो. त्याच्याकडे फलंदाजीची चांगली क्षमता आहे. जर तो पुढील ५-७ वर्षे असाच खेळला तर, तो कपिल देव यांच्या विक्रमाच्या जवळ येऊ शकतो.”
जाफरच्या आधी भारतीय संघाचा दुसरा माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनी देखील असेच काहीसे मत व्यक्त केलेले. हार्दिककडे भारताचा दिग्गज अष्टपैलू होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी म्हटलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन
युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीसंतचे बडेबोल! म्हणतोय, “मी असतो तर भारताने चार वर्ल्डकप जिंकले असते”