सातव्या टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ यंदा प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने केलेले एक ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. अनेक चाहत्यांनी या ट्विटवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जाफरने केले गमतीदार ट्विट
ट्विटरवर सातत्याने सक्रिय असणारा भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर आपल्या गमतीदार ट्विटसाठी ओळखला जातो. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला उद्देशून एक ट्विट केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली हा देखील दिसून येतोय. त्याने केलेल्या ट्विटमध्ये विराट आणि केन एकत्र बसलेले दिसत आहेत. तेव्हा विराट केनला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देतो. त्यानंतर केन त्याला धन्यवाद म्हणत, नाणेफेकीसाठी सल्ला मागतो. त्यावर विराट तोंड दुसरीकडे फिरवतो. या मजेदार ट्विटवर चाहत्यांनी अनेक गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
😅 #AUSvNZ #T20WorldCup pic.twitter.com/y1nRlWVQrD
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 13, 2021
अंतिम सामन्यात भिडणार शेजारी
दुबई येथे होणाऱ्या या अंतिम सामन्यात शेजारी राष्ट्र असलेले ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ समोरासमोर येतील. अत्यंत रोमांचक झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये या दोन्ही संघानी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघांकडे प्रथमच टी२० विश्वचषक उंचावण्याची संधी असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पाठोपाठ टी२० विश्वचषक जिंकण्याचा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा मानस असेल.
न्यूझीलंड संघाने ब गटातून दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. दुसरीकडे, न्यूझीलंडप्रमाणे ऑस्ट्रेलिया देखील आपल्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी आतूर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ट्राॅफीच्या डाव्या बाजूला उभं राहिलं की जिंकतंय? पाहा काय सांगतो आयसीसी विश्वचषकाचा इतिहास
न्यूझीलंडला ‘अंडरडॉग’ म्हटल्यावर आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
सावधान! तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरमूळे विराटचा सात वर्ष जुना विक्रम धोक्यात