मुंबई । उत्तराखंडच्या वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडने वसीम जाफर याच्या नावाची घोषणा सोमवारी केली. येत्या रणजी हंगामापासून ते उत्तराखंड संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
सीएयूचे सचिव महिम वर्मा म्हणाले की, “बीसीसीआयच्या निर्देशानुसार अनेक राज्य क्रिकेट संघटनेने येत्या क्रिकेटच्या हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने देखील राज्याच्या पुरुष आणि महिला संघाच्या प्रशिक्षकाची प्रथम नियुक्ती केली आहे. वसीम जाफर यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल.”
महिला संघाच्या प्रशिक्षकपदी संजय कुमार पांडे यांची नियुक्ती केली आहे. पुरुष आणि महिला संघासाठी फिजीओ आणि ट्रेनरची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी उत्तराखंडचे अध्यक्ष ज्योत सिंग गुनसोला, सचिव महिम वर्मा, तसेच ज्ञानेंद्र पांडे व निष्ठा फारशी हे उपस्थित होते.
माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने भारताकडून 31 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळला आहेत. वसीम हा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तसेच रणजी ट्रॉफीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मार्च 2020 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. जाफरने 256 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 50.95 च्या सरासरीने 19 हजार 211 धावा केल्या आहेत.
यांची झाली निवड
उत्तराखंड वरिष्ठ पुरुष संघ
मुख्य प्रशिक्षक : वसीम जाफर
वरिष्ठ महिला संघ
मुख्य प्रशिक्षक : संजय कुमार पांडे
ही वरिष्ठ महिला संघ
फिजियो : मीनाक्षी नेगी
वरिष्ठ महिला संघ
ट्रेनर : अपूर्वा
अंडर-19 व अंडर-16 महिला संघ
मुख्य प्रशिक्षक : अनाघा देशपांडे