---Advertisement---

कहर! WBBLमध्ये ‘या’ खेळाडूने फक्त 23 चेंडूत चोपल्या 114 धावा, चौकार-षटकारांच्या पावसात बॅटही तुटली

Grace-Harris
---Advertisement---

महिला बिग बॅश लीग 2023 स्पर्धा रंगतदार पद्धतीने पार पडत आहे. महिला बीबीएल स्पर्धेत दरदिवशी खेळाडू एकापेक्षा एक हटके असे कारनामे करताना दिसत आहेत. अशात स्पर्धेचा पाचवा सामना पर्थ स्कॉर्चर्स महिला विरुद्ध ब्रिस्बेन हीट महिला संघात पार पडला. हा सामना ब्रिस्बेन संघाने 50 धावांनी जिंकला. या विजयाची शिल्पकार ग्रेस हॅरिस ठरली. तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले.

झाले असे की, या सामन्यात पर्थ स्कॉर्चर्स महिला (Perth Scorchers Women) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना महागात पडला. यावेळी ब्रिस्बेन हीट महिला (Brisbane Heat Women) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 229 धावा कुटल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पर्थ संघ निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 179 धावाच करू शकला. अशाप्रकारे ब्रिस्बेनने हा सामना 50 धावांनी जिंकला.

पर्थ स्कॉर्चर्सकडून एकीचे अर्धशतक
महिला बिग बॅश लीग 2023 (Womens Big Bash League 2023) स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाच्या 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पर्थकडून बेथ मूनी हिने सर्वोच्च खेळी केली. तिने 30 चेंडूत 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ऍमी जोन्स हिनेही 30 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकली नाही.

यावेळी ब्रिस्बेनकडून गोलंदाजी करताना कर्टनी सिप्पेल हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, कर्णधार जेस जोनासन हिने 2 विकेट्स, तर जॉर्जिया वोल आणि ग्रेस हॅरिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रिस्बेनकडून ग्रेस हॅरिसचा धमाका
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीटकडून ग्रेस हॅरिस (Grace Harris) हिने धमाका केला. यावेळी तिने अवघ्या 48 चेंडूत शतक केले. तिने सलामीला फलंदाजी करताना 59 चेंडूत नाबाद 136 धावांची शतकी खेळी केली. ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली. तिने ऍशले गार्डनर हिचा 114 धावांचा विक्रम मोडला. आपल्या खेळीत 11 षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. फक्त चौकार आणि षटकारांच्या जोरावर तिने 23 चेंडूत 114 धावा कुटल्या. यादरम्यान तिची बॅटही तुटली होती. तिच्याव्यतिरिक्त फक्त मिंगोन डू प्रीझ हिने 39 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या वादळी खेळीच्या जोरावर ब्रिस्बेन संघ 200च्या पार धावसंख्या उभारू शकला.

यावेळी पर्थकडून गोलंदाजी करताना ऍमी एडगर हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, क्लो एन्सवर्थने 2, तर सोफी डिवाईन आणि लिली मिल्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (wbbl 2023 brisbane heat women vs perth scorchers women 5th grace harris fabulous knock)

हेही वाचा-
IND vs NZ सामन्यापूर्वी दिग्गजाच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष; हार्दिक पंड्याचे महत्त्व सांगत म्हणाला…
आता माझी सटकली! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भडकला द्रविड; म्हणाला, ‘सिक्स-फोर पाहायचे असतील, तर…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---