इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात प्रथमच एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात सुसंगत संघ म्हणून सीएसकेची ओळख होती. मात्र यंदाच्या आयपीएल 2020 च्या हंगामात त्यांचे आव्हान सर्वात आधी संपुष्टात आले. या अपयशानंतर संघाच्या कार्यक्षमतेवर आणि कर्णधार धोनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मात्र, आयपीएलच्या पुढच्या हंगामातही धोनीच कर्णधार असेल असा विश्वास सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे.
रविवारी (25 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यानंतर सीएसके संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
धोनीच करेल संघाचं नेतृत्व
टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या प्रतिनिधिशी बोलताना काशी विश्वनाथन म्हणाले की, “हो, नक्कीच. मला खात्री आहे की 2021 मध्ये धोनी सीएसकेचे नेतृत्व करेल. आयपीएलमध्ये त्याने आमच्यासाठी तीन विजेतीपदे जिंकली आहेत. हे पहिले वर्ष आहे ज्यामध्ये सीएसके संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. एका हंगामात खराब कामगिरी केली म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला संघात सर्वकाही बदलावे लागेल.”
संघाच्या संतुलनावर झाला परिणाम – विश्वनाथन
सीएसकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस आणि अष्टपैलू सॅम करन यांच्या व्यतिरिक्त बहुतेक सीएसके खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सीएसकेचा स्टार फलंदाज सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग वैयक्तिक कारणांमुळे 13 व्या हंगामातून माघार घेतली होती.
पुढे बोलताना विश्वनाथन म्हणाले की “कोव्हिड-19 या साथीच्या आजाराच्या भीतीमुळे दोन वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्याने संघाच्या संतुलनावर परिणाम झाला आहे. आम्ही या हंगामात आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. काही सामने सहज जिंकू शकत होतो, तरीही आम्ही ते सामने गमावले. यामुळे आम्ही या स्पर्धेत मागे पडलो.”
युवा खेळाडूंना दिली संधी
सीएसकेने या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना का मैदानात उतरवले नाही असे विचारले असता धोनीने सांगितले होते की, “त्यांनी चमकदार कामगिरी केलेली नाही त्यामुळे त्यांना संधी देऊ शकलो नाही.”
पण त्यानंतर युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड, नारायण जगदीशन आणि मोनू कुमार यांना अधिक संधी देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरविले.
ऋतुराज गायकवाड याने स्वतःला केले सिद्ध
पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाडने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक (51 चेंडू 65 धावा) झळकावून आपली क्षमता दाखवून दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने ट्विटर, इंस्टाग्राम बायोमधून काढला ‘इंडियन क्रिकेटर’ टॅग, यामागे नक्की कारण काय?
“त्याने केलेलं काम नेहमी मनात राहील”, धोनीने ‘त्या’ सुपरफॅनचे मानले आभार
व्हिडीओ: मॅक्सवेलच्या फिरकीत अडकला नितीश राणा, पहिल्याच षटकात दाखवला तंबूचा रस्ता
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो चेन्नईकडून आयपीएलमध्ये करतोय पदार्पण