महिला बीग बॅश लीगमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने छाप सोडणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला विश्वास आहे की भारतात देखील महिलांची आयपीएल लवकरच सुरु होईल. त्यामुळे भारतीय खेळाडूंना देखील जगभरातल्या प्रसिद्ध खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल.
महिला बीग बॅश लीगच्या या हंगामात हरमनप्रीतने ६६.५० च्या सरासरीने १३५.२५ स्ट्राईक रेटने ३९९ धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांमुळे तिच्या संघाला विजय प्राप्त करता आला. यासोबतच गोलंदाजीमध्ये देखील तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले. या स्पर्धेमध्ये ७.४६ च्या इकॉनॉमी रेटने १५ बळी घेत ती संघाची प्रमुख गोलंदाज देखील बनली आहे. तिला या लीगमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा किताब देण्यात आला आहे. त्यामुळे ३२ वर्षीय हरमनप्रीतने भारतात देखील लवकर महिला आयपीएल सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
ती म्हणाली की, ‘आम्ही याची वाट खूप आधीपासून बघतोय आणि मला आशा आहे की महिला आयपीएल लवकर सुरु होईल आणि आम्ही विदेशी खेळाडूंना भारतात बोलवू. त्यांचा अनुभव बाकी खेळाडूंसाठी देखील उपयोगी पडेल.’
ती पुढे देखील म्हणाली की, ‘खेळणं हे आमच्या हातात आहे आणि आम्ही तेच करतोय. बाकी सगळं बीसीसीआयच्या हातात आहे. आम्ही त्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही. आम्ही फक्त विनंती करू शकतो आणि तसं ते झालं देखील पाहिजे.’
महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत महिला आयपीएलचे ३ हंगाम झाले आहेत. यातील २ हंगामात हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखालील आयपीएल सुपरनोव्हाज संघाने विजय मिळवला आहे. २०१८ आणि २०१९ अशी २ वर्षे हा संघ विजेता राहिला आहे. परंतु २०२० च्या हंगामानंतर अद्याप महिला आयपीएलचा हंगाम खेळवला गेला नाहीये.
तसेच हरमनप्रीत कौरची टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दही उल्लेखनीय राहिली आहे. वर्ष २००९ पासून ते आतापर्यंत तब्बल १२० सामने खेळताना हरमनप्रीतने २७ च्या सरासरीने २३०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने १ शतकही झळकावले आहे. तसेच ६.१७ च्या इकोनॉमी रेटने ३० विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे पुन्हा महिला आयपीएलचा हंगाम झाल्यास हरमनप्रीत आपल्या प्रदर्शनाचा जलवा दाखवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्ज संघाची साथ सोडून केएल राहुल आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ संघात करणार प्रवेश?
वयाच्या २२ व्या वर्षी असा कारनामा करणारा शुबमन गिल चौथा भारतीय; दिग्गजांच्या यादीत मिळाले स्थान