---Advertisement---

‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया

On: रविवार, मे 22, 2022 2:39 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६९ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात शनिवारी (२१ मे) सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचे या हंगामातील प्लेऑफमध्ये जाण्याचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असल्याने त्याचा हा अखेरचा सामना होता. हा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरला. याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे.

सामन्यानंतर रोहित (Rohit Sharma) म्हणाला, ‘आम्ही येथे सामना जिंकण्यासाठी आलो होतो. मला माहित आहे, काही संघ आम्हाला पाहात होते. पण आम्हाला चांगल्या पद्धतीने शेवट करायचा होता. आम्ही पुढील हंगामात आमच्या चूका सुधारण्याचा प्रयत्न करू. आठ सामने पराभूत झाल्यानंतर गोष्टी कठीण झाल्या होत्या. त्यामुळे आम्हाला चुका दुरुस्त करण्याची गरज होती. पण मला वाटते आम्ही सत्राच्या दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी केली.’

तसेच एका क्षणी दबाव आल्याचेही रोहितने मान्य केले. तो म्हणाला, ‘जेव्हा दिल्ली १६० धावांपर्यंत पोहचले, तेव्हा मी निराश झालेलो, कारण खेळपट्टी मंद होती. चेंडू बॅटवर चांगल्यारितीने येत नव्हता. मला वाटते, जर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला १५०-१६० पर्यंत रोखले, तर तुम्हाला एका चांगल्या भागीदारीची गरज असते. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. पण इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविसच्या भागीदारीने आम्हाला चांगल्या स्थितीत आणले.’

रोहित पुढे म्हणाला, ‘अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल मी बोलत आहे.  गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांनी नाही. सामन्यात चांगल्या पद्धतीने पुढे जायला सांघिक कामगिरी महत्त्वाची असते. जेव्हा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तेव्हा फलंदाजांनी केली नाही. जेव्हा फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तेव्हा गोलंदाजांनी केली नाही. आम्ही लयीत यायला उशीर केला. पण आम्ही या हंगामातून नक्कीच काही सकारात्मक गोष्टी घेऊन जाऊ शकतो.’

रोहितने प्लेऑफमध्ये पोहचलेल्या संघांना शुभेच्छाही दिल्या. तो म्हणाला, ‘प्रत्येकवेळी आम्ही जेव्हा लिलावात जातो, तेव्हा आशा खेळाडूंवर नजर ठेवतो, जे आमच्यासाठी पुढील काही वर्षे खेळतील. आमच्या संघात काही युवा खेळाडू आहेत, जे पुढे जाऊन त्यांच्या देशासाठीही खेळतील. आरसीबी संघाचे अभिनंदन, ते प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मी प्लेऑपमध्ये पोहचलेल्या चारही संघांना शुभेच्छा देतो. सर्वोत्तम संघ जिंकेल.’

मुंबईने या हंगामात १४ पैकी केवळ ४ सामने जिंकले, तर १० सामने पराभूत झाले आहेत.

मुंबईने केला शेवट गोड 
शनिवारी झालेल्या सामन्यात (Mumbai Indians vs Delhi Capitals) दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या. दिल्लीकडून रोवमन पॉवेलने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तसेच कर्णधार रिषभ पंतने ३९ धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर १६० धावांचे आव्हान मुंबईने १९.१ षटकात पूर्ण केले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. तसेच डेवाल्ड ब्रेविसने ३७ धावा केल्या, तर टीम डेव्हिडने ११ चेंडूत ताबडतोड ३४ धावांची खेळी केली. दिल्लीकडून एन्रीच नॉर्किया आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात विजय मिळवत मुंबईने हंगामाचा शेवट गोड केला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

मस्ती आणि खूप सारा केक..! तेवतियाने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसंगे साजरा केला बर्थडे, पत्नीचीही हजेरी

युवा हंगारगेकरला का दिली नाही एकाही सामन्यात संधी? धोनीने स्पष्ट केले कारण

‘अविश्वसनीय रूपाने फिट व्यक्ती आहे धोनी’, थालाच्या आयपीएल २०२३ खेळण्याच्या निर्णयावर बोलले शास्त्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---