लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना पार पडला. या सामन्यात भारताने १५७ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयासह या सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहलीने केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनचीही बरीच चर्चा झाली होती.
या सामन्यात अखेरच्या दिवशी भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने ६२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हसीब हमीदला त्रिफळाचित करत माघारी धाडले होते. हमीद बाद झाल्यानंतर विराटचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता. तो हाताने तुतारी वाजवताना दिसून आला होता. त्याने अशाप्रकारे आनंद साजरा करत इंग्लंडचा फॅन क्लब बार्मी आर्मी यांना डीवचले होते. बार्मी आर्मी नेहमी मैदानात तुतारी वाजवत इंग्लंड संघाला प्रोत्साहन देत असते.
बार्मी आर्मीनेही सामना सुरु असताना विराटच्या या तुतारी सेलिब्रेशनवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की ‘विराट आम्हाला माहित आहे तुला आर्मीमध्ये सहभागी व्हायचे आहे, आम्हाला तुझा इशारा कळाला आहे.’ त्यामुळे विराटने सामन्यादरम्यान केलेल्या या तुतारी सेलिब्रेशनची बरीच चर्चा झाली. या सेलिब्रेशनला पाठिंबा देणारे आणि या सेलिब्रेशनवर टीका करणारे असे दोन गट पडल्याचेही सोशल मीडियावर दिसून आले.
दरम्यान, सामना संपल्यानंतर मात्र बार्मी आर्मीने खिलाडूवृत्तीने विराटचे हे सेलिब्रेशन स्विकारले आहे. सामन्यानंतर विराटच्या सेलिब्रेशनवर विविध प्रतिक्रिया येत असल्याचे पाहात बार्मी आर्मीने ट्विट केले आहे की ‘आम्ही एखादी गोष्ट केली आहे, तर ती परत तशीच स्विकारतोही. विराट, बरोबरीचा खेळ राहिला. आता मँचेस्टरमध्ये भेटू’.
इंग्लंड विरुद्ध भारत संघातील ५ वा आणि अखेरचा सामना मँचेस्टरमध्ये होणार आहे. हा सामना निर्णायक सामना आहे.
https://twitter.com/TheBarmyArmy/status/1435260025958772741
चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघ २१० धावांवरच सर्वबाद झाला. या विजयामुळे भारताने मालिकेतील पराभव टाळला असून आता अखेरचा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका जिंकण्याची संधी भारताकडे असणार आहे. तर इंग्लंडला मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर अखेरचा सामना जिंकण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. अखेरचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाचव्या कसोटी सामन्यासाठी जार्वोने केलीय अशी तयारी, म्हणतोय…
धोनीमुळे कसे बदलले आयुष्य, शार्दुल ठाकूरने केला खुलासा
ओव्हल कसोटीनंतर भारतीय खेळाडूंची झाली कोरोना चाचणी, जाणून घ्या काय आला रिपोर्ट